किरण अग्रवाल
कँडी (श्रीलंका) :महागाईने त्रस्त झालेल्या श्रीलंकेतील नागरिकांना या अडचणीच्या काळात भारताकडूनच मदतीची आस असून, आंतरराष्ट्रीय राजकारणाशी घेणेदेणे नसलेले लोक भारतच आपल्याला वाचवू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
श्रीलंकेत महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशाची राजधानी कोलंबोपासून कँडीपर्यंत ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. टंचाई असल्याने इंधनाची दरवाढ झाली आहेच, विजेची टंचाई असल्याने भार नियमनही करावे लागत आहे. अगदी कोलंबोतील आंतरराष्ट्रीय भंडारनायके विमानतळावरदेखील अनावश्यक विजेचा वापर रोखण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसून आले. येथे उतरतांना नेहमी रात्रीच्या वेळी विमानातून जो लखलखाट दिसून येई तो यंदा दिसला नाही. बहुतेक रस्ते व इमारतींमधले लाईट गुल होते.
दरम्यान, श्रीलंकेबाहेर येथील महागाईचा हाहाकार व राजकीय आंदोलनाचे जे चित्र दाखवले जाते आहे त्यामुळे पर्यटनाला फटका बसल्याने त्यावर अवलंबून असलेले प्रचंड नाराज आहेत. प्रत्यक्षात येथे पर्यटकांना कुठलीही अडचण जाणवत नाही. भारतातून येणाऱ्यांचे तर मनोभावे वेलकम केले जात आहे.
सत्तेच्या राजकारणातून..: वाढलेल्या महागाईचा फटका गरीब वर्गालाच बसत असून तोच दुकाने व पंपासमोर रांगेत उभा दिसत आहे. उच्चभ्रू वर्ग मात्र यात कुठेच नाही. येथे जे काही सुरू आहे ते सत्तेच्या राजकारणातून होत असल्याचा संतापही अनेकजण व्यक्त करतांना दिसतात.
इंडिया, देन नो प्रॉब्लेम; वेलकम!चेन्नईवरून कोलंबो विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय पर्यटकांच्या एका ग्रुपला 'यू आर फ्रॉम इंडिया, देन नो प्रॉब्लेम; आयु बोवन.. म्हणजे वेलकम...' म्हणत फारशा चौकशा न करता सहकार्य केले गेले.