ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 10 - इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमने (ICIJ) पनामा पेपर्सची लीक झालेली माहिती ऑनलाइन टाकली आहे. यामध्ये गुप्तरित्या कारभार करणा-या 2 लाखांहून अधिक कंपन्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
मोसेक फोन्सेकाकडून लीक झालेल्या डेटाबेसमधील काही कागदपत्रांच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. या डेटाबेसमध्ये गुप्तरित्या कारभार करणा-या 3 लाख 60 हजार व्यक्ती आणि कंपन्यांची माहिती देण्यात आली असल्याची माहिती इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमने दिली आहे.
पनामा पेपर्स लीकप्रकरणी एप्रिलमध्ये रिपोर्ट जाहीर करण्यात आला होता. पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर आयलँडचे पंतप्रधान सिगमंदर डेव्हिड गुनलॉसन आणि स्पेनचे औद्योगिक मंत्री जोस यांना राजीनामा द्यावा लागला होता. लोकहितासाठी तसंच टॅक्सचोरीच्या विरोधात जागतिक चळवळ म्हणून ही कागदपत्रे ऑनलाइन टाकत असल्याचं आयसीआयजेने सांगितलं आहे.
पनामा पेपर्स लीकमधील माहिती ऑनलाइन जरी टाकण्यात आलेली असली तरी यामध्ये सर्वच माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. ज्या कागदपत्रांमध्ये वैयक्तिक तसंच बँक खात्यांची माहिती आहे त्यांची माहिती शेअर केली गेलेली नाही.
काय आहे प्रकरण ?
श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण वगोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत भारतीयांचीही नावे असून त्यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सून ऐश्वर्या राय-बच्चन, उद्योजक गौतम अदानी, के.पी.सिंग यांच्यासह काही राजकारणीही आहेत.
या प्रकरणाचा खुलासा कसा झाला ?
म्युनिचमधील वृत्तपत्राने ही कागदपत्रे वर्षभरापूर्वी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम (ICIJ) सोबत हातमिळवणी केली. 100 हून अधिक माध्यम संस्थांनी या कागदपत्रांची तपासणी केली. जुलै 2015 साली इंडियन एक्स्प्रेसने आयसीआयजेसोबत पनामा कागदपत्रांसाठी भारतीय पार्टनर म्हणून करार केला होता. 76 देशातील तब्बल 375 पत्रकारांनी या कागदपत्रांची चाचपणी केली.
जगभरातील महत्वाच्या नेत्यांचा समावेश -
ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली आहे. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं आहे. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.