Infosys Russia : महिन्याभरापेक्षा अधिक कालावधीपासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात युद्ध सुरू आहे. अनेक देशांनी रशियाविरोधात अनेक निर्बंध लादले असून भारतानं यावर तटस्थ भूमिका घेतली होती. परंतु आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस (Infosys) आता रशियातील आपली सर्व कार्यालये बंद करणार आहे. ब्रिटिश माध्यमांनी कंपनीचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांचं जावई ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यावर व्लादिमीर पुतिन यांच्या राजवटीत नफेखोरी केल्याचा आरोप केला आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे चान्सलर आहेत. इन्फोसिसनं आपल्या रशियातील कर्मचाऱ्याना अन्य ठिकाणी काम शोधण्यास सांगितलं आहे. तसंच त्यांच्यावर तेथील कामकाज बंद करण्याचा दबाव असून युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त बीबीसीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
यापूर्वी इन्फोसिसने स्थानिक उद्योगांशी कोणतेही सक्रीय व्यावसायिक संबंध असल्याचा वृत्तांना नकार दिला होता. याशिवाय युक्रेनमधील युद्धातील पीडितांना मदत म्हणून कंपनीने १ दशलक्ष डॉलर्स देण्याचं वचनही दिलं होते.
का आहे दबाव?ऋषी सुनक यांचा विवाह नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी झाला आहे. अक्षता मूर्ती यांचे इन्फोसिसमध्ये ४० कोटी पौंडांपेक्षा जास्त शेअर्स असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ऋषी सुनक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. अक्षता मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसमध्ये ०.९ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त हिस्सा असल्याचा अंदाज आहे. ऋषी सनच्या प्रवक्त्याने यापूर्वी म्हटले आहे की त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा कंपनीच्या कामकाजाच्या निर्णयांमध्ये कोणताही सहभाग नाही.
६ वर्षांपासून व्यवसायसुमारे ५० देशांमध्ये उपस्थिती असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Infosys ने २०१६ मध्ये मॉस्को येथे एक अभियांत्रिकी केंद्र स्थापन केलं. तेथे १०० कर्मचारी कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक आयटी कंपन्यांनी देशातील त्यांचे कामकाज थांबवलं. पण इन्फोसिसने आपली एक छोटी टीम तिथे काम करत असल्याचं म्हटलं होतं.