युद्धात सर्वांत जास्त भोगावं लागतं ते स्त्रियांना आणि मुलांना. इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धातही हेच सत्य समोर येत आहे. २४ ते ३० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान झालेल्या युध्दबंदीत झालेल्या देवाणघेवाणीदरम्यान सुटका झालेल्या ओलिसांंमध्ये सुमारे अडीचशे पॅलेस्टिनी मुलं होती. त्य्पयात्शतून एक प्रश्न संपूर्ण जगाला पडला तो म्हणजे इस्त्रायलच्या तुरुंगात इतकी पॅलेस्टिनी लहान मुलं कशी? या मुलांचा गुन्हा विचाराल तर इस्त्रायलने जबरदस्तीने मिळवलेल्या पॅलेस्टिनी भूमीवरील इस्त्रायलच्या लोकांवर, तेथील जमिनीवर दगडफेक करणे.
इस्त्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी मुलांपैकी सर्वात लहान मुलगा १४ वर्षांचा अहमद सलामे याची इस्त्रायलने सुटका केली. सलामे याला मे महिन्यात इस्त्रायलने ताब्यात घेतलेल्या पूर्व जेरुसेलमधील ज्यू लोकांच्या वस्तीवर दगडफेक केल्याच्या आरोपावरून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. दगडफेक अगदीच किरकोळ गुन्हा. पण या गुन्ह्यासाठी इस्त्रायलमधील लष्करी कायद्यानुसार खटला चालवून शिक्षा म्हणून कितीही वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
सलामे याला मे महिन्यात अटक केल्यानंतर तो त्याच्या कुटुंबाला एकदाही भेटला नाही की, त्यांच्याशी बोलू शकला नाही. युद्धबंदीदरम्यान सलामेची सुटका झाली तेव्हा आपल्या कुटुंबाला भेटल्यानंतर जाहीर आनंद साजरा करायचा नाही, सुटका झाल्याच्या दिवशी घरी गेल्यानंतर घरातून बाहेर पडायचं नाही, घोषणा द्यायच्या नाहीत, अशा अटी त्याच्यावर लादल्या गेल्या. त्याने एक जरी नियम मोडला तर त्याला पुन्हा तुरुंगात डांबलं जाईल अशी धमकी दिली होती. २०११ मध्ये इस्त्रायल आणि हमास यांच्यादरम्यान त्यांच्या ताब्यातील परस्परांच्या नागरिकांची देवाणघेवाण झाली होती. तेव्हाही इस्त्रायलने अनेक पॅलेस्टिनी मुलांची सुटका केली होती. पण ही सुटका अल्पकालीन ठरली. २०१४ मध्ये या मुलांना पुन्हा अटक करण्यात आली., तेव्हापासून आतापर्यंत अनेक पॅलेस्टिनी मुलं इस्त्रायली तुरुंगात लष्कराचा छळ सोसत आहेत. इस्त्रायलच्या ताब्यात असलेली पॅलेस्टिनी मुलं सोडली जातात तेव्हा त्यांच्यावर बंधनं घातलेली असतात. त्यांना इतरत्र प्रवास करण्यास मनाई असते. त्यांना मुक्तपणे वावरता येत नाही. पूर्व गुन्हेगार म्हणून त्यांना इस्त्रायलचं सैन्य पुन्हा कधीही अटक करू शकतं. यावर काहीच उपाय नाही असं पॅलेस्टिनी मुलांच्या बाजूने कायदेशीर लढाई लढणाऱ्या ‘डीफेन्स फाॅर चिल्ड्रन इंटरनॅशनल पॅलेस्टाइन’चे धोरणात्मक सल्लगार ब्राड पार्कर सांगतात. पॅलेस्टिनी मुलांना भेट स्वरूपात मिळालेली ही सुटका इस्त्रायली सैन्य कधीही परत घेऊ शकतं.
अटक झाल्यानंतर पुन्हा लवकर बाहेर यायचं असेल तर पॅलेस्टिनी मुलांच्या समोर त्यांच्यावर लावलेले दगड फेकण्याचे, भोसकण्याचे गुन्हे मान्य करावेत हाच उपाय असतो. ते मान्य केले तरंच कधीतरी सुटका होईल, ही आशा त्यांना बाळगता येते. पण इस्रायली सैन्याने त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी कशावरही निर्दोष असलेल्या मुलांनी आक्षेप घेतला तर त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुरुंगात खितपत पडावं लागतं. तेथील छळ सोसता सोसता अनेक मुलं नंतर बाहेर येऊन ना आपल्या कुटुंबांना भेटण्याच्या अवस्थेत राहातात, ना पुन्हा शाळेत जाऊन शिकण्याच्या!
अहमद मन्सारा याला इस्त्रायलच्या ताब्यातील पूर्व जेरुसेलममधील दोन इस्त्रायली नागरिकांना भोसकण्याच्या गुन्ह्याखाली २०१५ मध्ये इस्त्रायलच्या सैन्याने अटक केली. खरंतर तो दोषी नव्हता. मन्साराला अटक झाली तेव्हा तो केवळ १३ वर्षांचा होता. गेल्या नऊ वर्षांतला तुरुंगावास भोगल्याचा परिणाम म्हणजे मन्साराला स्किझोफ्रेनियाने ग्रासलं आहे. त्याला दिवसाचे २३ तास छोट्या अंधाऱ्या खोलीत राहावं लागल्याने त्याची दृष्टीही अधू झाली आहे. आज हेच भोग इस्त्रायली लष्कराच्या तुरुंगात असणाऱ्या अनेक पॅलेस्टिनी मुलांच्या वाट्याला आले आहेत. यातून त्यांची सहीसलामत सुटका होईल का ?
या मुलांचं पुढे काय होणार? गेल्या २० वर्षांत साधारणत: १०,००० पॅलेस्टिनी मुलांना इस्त्रायलच्या लष्कराने अटक केली आहे. २०२३ मध्ये ८८० पॅलेस्टिनी मुलांना अटक करण्यात आली. या मुलांना रात्रीच्या अंधारात पकडलं गेलं. आई-वडील, वकील यांच्या अनुपस्थितीत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. तुरुंगात असलेल्या मुलांना बेदम मारलं जातं, त्यांना हवा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव असलेल्या कोंदट खोल्यांमध्ये कोंडलं जातं. पकडण्यात आलेल्या पॅलेस्टिनी मुलांवर इस्त्रायली लष्करी कायद्याप्रमाणे कठोर कारवाई होते. ही मुलं दोषी नसली तरी त्यांना अमानुष शिक्षा मात्र भोगावीच लागते.