समारा : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) दहशतवाद्यांनी बगदादच्या उत्तरेकडील काही खेडी आणि गावांमध्ये शुक्रवारी कॅमेरामनसह 13 जणांना ठार मारले. अधिकारी, मृतांचे नातेवाईक व प्रत्यक्ष हे हत्याकांड बघणा:यांकडून ही माहिती समजली.
तिक्रीत शहराच्या पूर्वेकडील समारा खेडय़ात स्थानिक वृत्त वाहिनी समा सलाहेद्दीनचा कॅमेरामन राद अल अझावी (37) याच्यासह त्याचा भाऊ व अन्य दोन ग्रामस्थांची सार्वजनिक ठिकाणी जिहादींनी गोळ्या घालून हत्या केली, असे अझावीच्या नातेवाईकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
दहशतवाद्यांची संघटना आपल्यालाही ठार मारील अशी भीती या नातेवाईकांना आहे. माध्यमांवर निगराणी ठेवणा:या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी गेल्या 7 सप्टेंबर रोजी तीन जणांचा पिता असलेल्या अझावीला स्थानबद्ध करून ठेवले होते.
ते त्याच्या घरी आले आणि त्याला त्याच्या भावासह घेऊन गेले. खरे तर त्याने काहीही चूक केलेली नव्हती. त्याचा फक्त एकच
अपराध होता, तो म्हणजे तो कॅमेरामन होता व तो त्याचे काम करीत होता, असे अझावीच्या नातेवाईकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)