सोशल मीडियावरील टांझानियाचा इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर, किली पॉल (Kili Paul Instagram) जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील विविध भाषांमधील गाण्यांवर रील बनवणाऱ्या (Kili Paul Reels on Bollywood Songs) किलीचे आणि त्याच्या बहिणीचे लाखो फॉलोअर्स आहेत. विशेषत: भारतात या दोघांना विशेष प्रसिद्ध मिळाली आहे. दरम्यान किलीच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. किली पॉल अज्ञात व्यक्तींनी केलेल्या चाकु आणि लाठी हल्ल्यात जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा या सोशल मीडिया सेन्सेशनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. त्याने यामध्ये असे म्हटले आहे की, या हल्ल्यात (Attack on Kili Paul) तो जखमी झाला असून त्याला पाच टाके देखील पडले आहेत. किलीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो एका बेडवर जखमी अवस्थेत पडलेला दिसत आहे.
ही स्टोरी शेअर करताना त्याने या हल्ल्याची माहिती देणारं एक कॅप्शन शेअर केलं आहे. त्याने असं म्हटलं आहे की, 'माझ्यावर ५ जणांनी हल्ला केला, स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात माझ्या उजव्या हाताला चाकूने दुखापत झाली आणि मला ५ टाके पडले आणि मला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. पण मी देवाचे आभार मानतो की दोघांना मारून स्वतःचा बचाव करू शकलो. ते पळून गेले पण मी आधीच जखमी होतो, माझ्यासाठी प्रार्थना करा.'
भारतीय गाण्यांच्या व्हायरल लिप-सिंकिंग व्हिडीओंमुळे किली वेळोवेळी चर्चेत असतो. त्याने अलीकडेच आलेल्या 'KGF 2' मधील डायलॉग, पुष्पामधील गाणी, भारतात प्रसिद्ध झालेली विविध गाणी, भारतीय इन्स्टा इन्फ्लुएन्सर्सनी पोस्ट केलेली रील्स इ. यावर किलीने रील्स पोस्ट केले आहेत. भारतीय स्टार्सकडूनही अनेकदा त्याची प्रशंसा झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'मन की बात' मध्ये किली पॉल आणि त्याची बहिण नीमा पॉल यांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले होते. तर त्याआधी काही दिवसापूर्वी टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने किली पॉल याला सन्मानित केलं होत.