ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १२ - भारतीय चौक्यांवर गोळीबार करणा-या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला पत्र पाठवून काश्मीर विषयामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. भारतानेच गेल्या आठवड्याभरात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असे पाकने संयुक्त राष्ट्राला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्तरावर रेटण्यासाठी पाकिस्नानने हालचाली सुरु केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रातील भाषणात पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केला होता. आता याच मुद्यावर पाकने संयुक्त राष्ट्राचे प्रमुख बान की मून यांना निवेदन पाठवत भारतविरोधात गा-हाणे मांडले. भारत जाणूनबुजून आणि विनाकारण शस्त्रसंधीचे उळ्लंघन करत असून या गोळीबारात पाकमधील १२ नागरिक ठार झाले. तर नऊ जवान आणि ५२ नागरिक जखमी जखमी झाल्याचे पाकने म्हटले आहे. भारताने कोणतेही ठोस कारण न देता दोन्ही देशांमधील सचिवस्तराची बैठक रद्द केली असे पाकचे म्हणणे आहे. पाक पंतप्रधानांचे परराष्ट्र व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीज यांनी हे पत्र पाठवले आहे.