किव्ह : अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र रशियाने डागल्याचा दावा युक्रेनने केला आहे. निप्रो या शहरावर गुरुवारी सकाळी या क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. अस्त्राखान परिसरातून हा हल्ला करण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियाने मात्र, या दाव्यास दुजोरा दिलेला नाही.
अस्त्राखान आणि निप्रो या शहरांमधील अंतर ७०० किलोमीटर आहे. युक्रेनच्या हवाई दलाने दावा केला आहे की, रशियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राशिवाय क्रूझ क्षेपणास्त्रांनीही हल्ले केले. त्यापैकी ६ क्षेपणास्त्रे पाडण्यात आली. याशिवाय किंझाल हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रदेखील डागले.
रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे नाव सरमत असून, त्यात एकाचवेळी १० बॉम्ब नेता येऊ शकतात. ते रडार व इतर ट्रॅकिंग यंत्रणेला चकमा देण्यात सक्षम आहे. युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी मिळाल्यानंतर रशियाने आक्रमक पावित्रा घेतला असून हल्ले वाढविले आहेत.