नवी दिल्ली - कोरोना व्हायरस बाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरने आपली पत्नी आणि मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील कॉलिफोर्निया येथील या डॉक्टरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात ३० हजारहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून डॉ. टिम्मी चेंग येथे कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.
कोरोनावर उपचार करत असलेल्या अनेक डॉक्टरांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी डॉ. चेंग यांनी गॅरेजमध्ये टेन्टमध्ये राहण्यास सुरुवात केली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. चेंग क्रिटीकल केअर स्पेशलीस्ट आहेत. ते सध्या आपल्या घरात असलेल्या गॅरेजमध्ये टेन्ट उभारून राहत आहेत.
रुग्णालयातील आपली शिफ्ट पूर्ण केल्यानंतर डॉ.चेंग टेन्टमध्ये राहतात. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली असून त्यात म्हटले की, मी स्वत: घराच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना मला लागण झाली तरी, माझे कुटुंबीय सुरक्षीत राहू शकले, यासाठी मी हा निर्णय़ घेतल्याचे डॉ. चेंग यांनी सांगितले.
डॉ. चेंग पुढे म्हणाले, मी एक रात्र कारमध्ये काढली होती. तर चार रात्री रुग्णालयाच्या कॉल रुममध्ये काढल्या. पाचव्या दिवशी माझ्या पत्नीने गॅऱेजमध्ये टेन्ट लावण्याची आयडिया सुचवली. डॉ. चेंग कॉलिफोर्निया येथील इरविनमधील युसीआय मेडिकल सेंटरमध्ये काम करतात. अमेरिकेत कोरोना व्हायरस पीडितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील अनेक महिन्यांपर्यंत आपल्याला टेन्टमध्ये राहावे लागणार असल्याचे डॉ. चेंग यांनी सांगितले.
डॉ. चेंग यांनी आपला अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट अनेक लोकांनी शेअर केली आहे. तसेच हेल्थकेअर वर्कर्स घरापासून दूर होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरीच राहा असे आवाहन डॉ. चेंग यांनी केले आहे.