श्रीनगर - पाकिस्तानच्या कोक स्टुडिओने आपल्या युट्युब चॅनेलवरुन नुकतेच एक गाणे प्रदर्शित केले आहे. 'हा गुलो' असे या गाण्याचे बोल असून अतिशय कमी वेळेत हे गाणे संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय बनले आहे. केवळ दोनच दिवसात या गाण्याला युट्यूब दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. इंटरनेटवर हिट होत असलेल्या या गाण्याला काश्मीरमधील अनंतनागच्या मोहम्मद अल्ताफ मीर यांनी गायले आहे. विशेष म्हणजे अल्ताफ मीर यांनी 28 वर्षापूर्वी दहशतवादी बनण्यासाठी घरातून पलायन गेले होते. मात्र, ते गायक बनल्याची त्यांची इंटरेस्टींग स्टोरी आहे.
अल्ताफ मीर यांचे जीवन अतिशय वळणावळणाचे राहिले आहे. सन 1990 मध्ये म्हणजेच 28 वर्षांपूर्वी मीर यांनी दहशतवादी संघटनात सहभागी होण्यासाठी आपले घर सोडले. शेकडो तरुणांसमवेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये मीर यांनी प्रवेश केला. त्यानंतर कुटुंबीयांशी अल्ताफ यांचा कुठलाही संपर्क राहिला नाही. त्यामुळेच अल्ताफ दशतवाद्यांच्या लढाईत ठार झाल्याचे कुटुबीयांना वाटले. मात्र, 2017 नंतर अल्ताफच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. पाकिस्तानच्या कोक स्टुडिओ टीमने नवीन प्रतिभावंत कलाकारांसाठी स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेसाठी निवडलेल्या 7 बँडपैकी अल्ताफ मीर यांच्या कसमीर बँडचीही निवड करण्यात आली. तर गेली कित्येक वर्षे मीर हे पाकिस्तान रेडिओसोबतही जोडले गेले आहेत. पण, कोक स्टुडिओतून संधी मिळाल्यानंतर मीर हे गायक म्हणून जगासमोर आले.
अल्ताफ यांच्या या यशामुळे 28 वर्षानंतर मीर यांच्या कुटुंबात आनंदी-आनंद झाला आहे. 28 वर्षांपूर्वी दहशतवादी बनण्यासाठी ज्या युवकाने घर सोडले, तो तरुण आज सिंगिंग स्टार बनला आहे. आता, अल्ताफच्या कुटुंबीयांनीही त्याच्या वाटेकडे डोळे लावले आहेत. लवकरच आपला मुलगा घरी परत येईल, अशी आशा मीर यांच्या अनंतनाग येथील कुटुबातील सदस्यांना आहे.