कीव्ह-
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनने हा वाद आता वाढवू नये, असे आयसीजेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय युक्रेनमध्ये रशियाच्या बळाचा वापर करत असल्याबद्दल अत्यंत चिंतित आहे, असं या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटलं आहे. आता रशिया आयसीजेच्या आदेशाचे पालन करतो की नाही हे पाहावं लागेल.
"रशियानं युक्रेनमध्ये बळाचा वापर केल्यानं आम्ही खूप चिंतीत आहोत. यातून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या गंभीर समस्यांना जन्म दिला गेला आहे", असं आयसीजेनं म्हटलं. "न्यायालयाला युक्रेनमध्ये घडणाऱ्या मानवी शोकांतिकेची पूर्ण कल्पना आहे. न्यायालयाने रशिया आणि युक्रेनला सध्याच्या वादाचा पाठपुरावा न करण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या बाजूने कोणत्याही पक्षाने यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालय कोणताही निर्णय घेईल, तो सर्वांवर बंधनकारक असेल, असं न्यायाधीश जोन डोनोघ्यू यांनी न्यायालयाचा निर्णय वाचून दाखवताना म्हटलं.
आम्ही जिंकलो- जेलेन्स्की"युक्रेनने रशियाविरुद्धचा खटला आयसीजेमध्ये जिंकला आहे. आयसीजेने हा हल्ला तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंधनकारक आहे. रशियाने त्वरित त्याचे पालन केले पाहिजे. न्यायालयाचा आदेश न पाळल्यास रशिया आणखी एकटा पडेल", असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेलोदिमीर जेलेन्स्की म्हणाले.
रशियाने निर्णय स्वीकारला नाही तर काय होईल? जर एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर ICJ न्यायाधीश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात, जेथे रशियाला व्हेटो पॉवर आहे. युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांना रशियाला तात्काळ लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याचे आवाहन केले. यापूर्वी 7 मार्च रोजी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली होती. रशियाने सुनावणीवर बहिष्कार टाकला होता.