नवी दिल्ली : कथित हेरगिरी व दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्याचा निकाल आज लागणार आहे. या सुनावणीसाठी पाकिस्तानची कायदे विषयक टीम हेग येथे पोहचली आहे.
पाकिस्तानी मीडियानुसार पाकच्या कायदे विषयक टीमचे नेतृत्व ज्येष्ठ वकील मंसूर खान करत आहेत. त्याच टीमसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसलदेखील उपस्थित आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेला पाकिस्तानकडून विरोध केला जाणार आहे.
सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली होती. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने विरोध केला आहे.
भारताचं म्हणणं आहे की, कुलभूषण जाधव यांनी निवृत्ती घेतली आहे. ते व्यापाराच्या दृष्टीकोनातून इराणला गेले होते. ज्याठिकाणाहून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. पाकिस्तान न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तान कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याचा निकाल देणार आहेत. कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याचा आदेश पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावा म्हणून तिथे भारताने दाद मागितली होती. जाधव यांचा भारतीय राजदूतावासाशी संपर्क होऊ न देणे, खोट्या पुराव्यांवर खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावणे अशी कृत्ये करून पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण जाधव प्रकरणात काय निकाल येतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.