युक्रेन प्रकरणी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आयसीसीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा झटका दिला आहे. आयसीसीने व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, या प्रकरणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, "व्लादिमीर पुतिनविरुद्ध आयसीसीचे वॉरंट ही 'केवळ सुरुवात' आहे." तसेच, व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आयसीसीचा निर्णय हा रशियाच्या आक्रमणाबाबत न्याय पुनर्संचयित करण्याच्या दिशेने केवळ एक प्राथमिक पाऊल असल्याचे युक्रेनच्या वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी सांगितले.
व्लादिमीर पुतिन यांचे सैन्य युक्रेनमध्ये पोहोचले, तेव्हा युक्रेन लवकरच रशियापुढे गुडघे टेकणार असल्याचा अंदाज सर्वांनीच बांधला होता. मात्र, अद्याप तसे होताना दिसत नाही. याउलट युक्रेन ठामपणे आघाडीवर आहे. अशा स्थितीत आता रशिया आणि पुतिन यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक तज्ज्ञ रशियाचे विघटन आणि पुतिन यांच्या पतनाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
रशियाचे माजी मुत्सद्दी बोरिस बोंडारेव्ह यांनी म्हटले आहे की, जर पुतिन हे युद्ध स्वतःच्या अटींवर जिंकण्यात यशस्वी झाले नाहीत तर त्यांना पायउतार होण्यास भाग पाडले जाऊ शकते. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर बोंडारेव्ह यांनी जाहीरपणे राजीनामा दिला होता. ते जिनिव्हा येथील रशियाच्या राजनैतिक मिशनमध्ये आर्म्स कंट्रोल एक्सपर्ट म्हणून काम करत होते. पुतिन हे सुपरहिरो नाहीत. त्याच्याकडे कोणतीही महासत्ता नाही. ते एक साधे हुकूमशहा आहेत, त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
चीन घेणार महत्त्वाचा राजनैतिक पुढाकारचीनने अलीकडेच मुस्लिम जगातील दोन मोठे देश इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील शत्रुत्व संपवले आहे. यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी एक महत्त्वाचा राजनैतिक पुढाकार घेणार आहेत. सोमवारी जिनपिंग दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जात आहेत. संपूर्ण जग युक्रेन युद्धात यशस्वी होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, युक्रेन युद्ध हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या महत्त्वाकांक्षेचे युद्ध असले तरी त्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर झाला आहे.