बल्गेरिया देशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झाडांनी वेढलेल्या रिकाम्या शेतात एक ट्रक बऱ्याच वेळापासून उभा होता. या कंटेनर ट्रकला पाहून स्थानिकांच्या मनात भीती निर्माण झाली. यानंतर स्थानिकांनी चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र चालक सापडला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.
कंटेनरमध्ये 18 मृतदेहपोलीस घटनास्थळी आले, बॉम्ब निकामी पथकालाही पाचारण करण्यात आले. यानंतर पोलिसांनी डब्याचा दरवाजा उघडला आणि त्यांना कंटेनरमध्ये 18 मृतदेह आढळले. कंटेनरच्या एका कोपऱ्यात काही जिवंत लोकही बिलगून बसलेले होते. त्यांची शारीरिक स्थितीही फारशी चांगली नव्हती. त्यातील काही बेशुद्धही पडले होते. तपासात कंटेनरमधील मृत आणि जिवंत सर्व अफगाणिस्तानातील असल्याचे आढळले. कंटेनरमध्ये लपून ते बल्गेरियात दाखल झाले. मात्र त्यापूर्वीच अनेकांचा मृत्यू झाला.
अफगाणिस्तानातून लोक आलेबल्गेरियाच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले की, ट्रकमध्ये 40 अफगाण प्रवासी होते. त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. डब्यात ऑक्सिजन नसल्यामुळे 18 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उर्वरित 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परप्रांतीयांचे कपडेही भिजलेले होते. तसेच ते सर्वजण अनेक दिवसांपासून उपाशी होते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सात संशयितांना अटकया घटनेनंतर सात संशयितांना बल्गेरियाच्या विविध भागातून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ट्रकचा चालक आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. तुर्की सीमेवरून बल्गेरिया-सर्बिया सीमेवर स्थलांतरितांची तस्करी करण्यात गुंतलेल्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटशी या संशयितांचा संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवाशांनी प्रत्येकी 5,000 ते 7,000 युरो भरले होते.
यूके फ्रीझर कंटेनरची आठवण ताजी झालीया घटनेने 2019 च्या UK फ्रीझर कंटेनरच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यावेळी इंग्लंडमधील एका कंटेनरमधून 39 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मृतांचे वय 15-44 वर्षांच्या दरम्यान होते. ते व्हिएतनाममधून स्थलांतरित होते आणि आश्रय घेण्यासाठी युरोपमध्ये प्रवेश केला होता.