कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाने 60 लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. जगभरात यावर संशोधन सुरू असून संशोधनातून धडकी भरवणारी माहिती आता समोर आली आहे. शास्त्रज्ञांना समुद्रात 5500 नवीन व्हायरस सापडले आहेत. अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासारखे हे देखील RNA व्हायरस आहेत. भारताच्या अरबी समुद्रात आणि हिंदी महासागराच्या वायव्य भागातही हे व्हायरस आढळून आले आहेत, ही चिंतेची बाब आहे.
सायन्स जर्नलमध्ये नुकताच हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. व्हायरस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी जगातील सर्व समुद्रातील 121 भागातील पाण्याचे 35 हजार नमुने घेतले. तपासणीत त्यांना सुमारे 5,500 नवीन RNA व्हायरस सापडले. हे 5 सध्याच्या प्रजाती आणि 5 नवीन प्रजातींचे होते. संशोधक मॅथ्यू सुलिवान यांनी नमुन्यांनुसार नवीन व्हायरसची संख्या खूपच कमी आहे. भविष्यात लाखो व्हायरस सापडण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे.
शास्त्रज्ञांच्या मते हे संशोधन विशेष RNA व्हायरसबद्दल केले गेले आहे, कारण शास्त्रज्ञांनी डीएनए व्हायरसच्या तुलनेत त्यांच्यावर कमी अभ्यास केला आहे. संशोधनात टाराविरिकोटा, पोमिविरिकोटा, पॅराजेनोविरिकोटा, वामोविरिकोटा आणि आर्कटिविरिकोटा नावाच्या 5 नवीन व्हायरस प्रजाती आढळल्या आहेत. यापैकी टाराविरिकोटा प्रजाती जगातील प्रत्येक समुद्रात आढळतात. तर आर्कटिविरिकोटा प्रजातींचे व्हायरस हे आर्कटिक समुद्रात आढळून आले आहेत.
संशोधनात RNA व्हायरसमध्ये RdRp नावाचा एक प्राचीन जीन आढळून आला आहे. असे मानले जाते की हा जीन अब्जावधी वर्षे जुने आहे. तेव्हापासून तो आतापर्यंत अनेक वेळा विकसित झाला आहे. सुलिवान यांच्या मते, पर्यावरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा शोध खूप महत्त्वाचा आहे. हा अभ्यास सागरी हवामान बदलाचा तपास करणार्या तारा ओशियंस कन्सोर्टियम नावाच्या जागतिक प्रकल्पाचा भाग आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.