पॅरिस - जागतिक पोलीस यंत्रणा म्हणून ओखळ असलेल्या इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहेत. फ्रान्सपोलिसांना त्यांच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. मेंग होंगवेई हे फ्रानमधून आपला मूळ देशी चीनला रवाना झाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. 29 सप्टेंबरला फ्रान्स येथून रवाना झाल्यापासून मेंग यांच्या पत्नीचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यानंतर मेंग यांच्या पत्नीने फ्रान्समधील लिओन येथील पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, मेंग यांच्या बेपत्ता होण्याचा तपास करत असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये मेंग यांचे चीनमधील अधिकाऱ्यांसोबत काही मतभेद झाल्याचे तसेच त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असावे, असे वाटते." हल्लीच्या वर्षांमध्ये चिनी अधिकारी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे प्रकार घडल्यानंतर बऱ्याच काळाने त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती चिनी सरकार देते. 64 वर्षीय मेंग यांना चीनमध्ये दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असे वृत्त हाँगकाँगमधील साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने गोपनीय सूत्राच्या हवाल्याने दिले आहे. मात्र मेंग यांना कोणत्या कारणासाठी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले हे या सूत्रांनी सांगितलेले नाही. दरम्यान, इंटरपोलच्या प्रमुखांचे बेपत्ता होणे हे चिंताजनक आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी पोलीस संस्था असून, 192 देश या संस्थेचे सदस्य आहेत.