युक्रेनचा हल्ला; रशियन युद्धनौकेचे मोठे नुकसान, काळ्या समुद्रातील घटना; सर्व नौसैनिकांना सुरक्षितस्थळी हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:30 AM2022-04-15T07:30:27+5:302022-04-15T07:30:42+5:30
काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवा हिचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
कीव्ह :
काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवा हिचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, रशियाने या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. आमच्या यु्द्धनौकेत आग लागल्यामुळे तिचे नुकसान झाले, असे रशियाने सांगितले. पूर्व युक्रेनमध्ये रशिया लवकरच मोठे हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यांना कडवा प्रतिकार करण्यासाठी युक्रेनचे सैनिक सज्ज आहेत.
ओडेसा प्रांताचे गव्हर्नर मॅकसिम मार्चेन्को यांनी सांगितले की, युक्रेनच्या सैनिकांनी डागलेल्या दोन क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे मोस्कवा या युद्धनौकेचे मोठे नुकसान झाले. या युद्धनौकेवरील दारुगोळ्याचा स्फोट झाल्याने आग लागली, अशी सारवासारव रशियाने केली आहे. या नौकेवर सुमारे ५०० नौसैनिक होते.
युक्रेनला ६० अब्ज रुपयांची अतिरिक्त मदत
रशिया युक्रेनमध्ये नरसंहार घडवत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला होता. तसेच युक्रेनला अतिरिक्त ६० अब्ज रुपयांची लष्करी मदत देण्याचे बायडेन यांनी जाहीर केले आहे. लष्करी हेलिकॉप्टर, तोफा, दारुगोळा ही सामुग्रीही अमेरिका युक्रेनला देणार आहे. बायडेन यांनी ही घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी युक्रेनने रशियाच्या युद्धनौकेवर हा हल्ला केला आहे.
जेलेन्स्की यांनी मानले अमेरिकेचे आभार
अतिरिक्त लष्करी मदतीबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, ज्या देशांच्या नेत्यांनी युद्धप्रसंगी युक्रेनला पहिल्या दिवसापासून मदत केली, त्यांचा मी आभारी आहे.
युद्धाचा विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर होईल परिणाम
- संयुक्त राष्ट्रे : युक्रेनविरोधात रशियाने सुरू केलेल्या युद्धामुळे विकसनशील देशांची अर्थव्यवस्था डळमळीत होण्याची शक्यता आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. खाद्यतेल, इंधन यांच्या किमती वाढल्यास अन्नधान्याचेही दर वाढतात. हा बोजा फार काळ सहन करण्याची विकसनशील देशांची क्षमता नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
- यासंदर्भातील एका अहवालाचे प्रकाशन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी बुधवारी केले. ते म्हणाले की, कोरोनाची साथ, हवामान बदल, निधीची चणचण या गोष्टींमुळे विकसनशील देशांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच इंधन दरवाढ सुरू आहे. त्यामुळे ही स्थिती अधिक बिकट होईल.
चार देशांच्या राष्ट्राध्यक्षांचा युक्रेन दौरा
पोलंड, लिथुआनिया, लॅटव्हिया, इस्टोनिया या चार देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये बुधवारी जाऊन तेथील राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांची भेट घेतली व त्यांना पाठिंबा दर्शविला. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यांमुळे जे प्रचंड नुकसान झाले, त्याची पाहणी चार देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी बोरोदियांका भागात जाऊन केली. त्यांनी ट्रेनने कीव्हपर्यंतचा प्रवास केला.