चीनच्या कुरापती अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीत. आता चीननंभारताच्याअरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांची नावे बदलली आहेत. चीननं त्या क्षेत्रांना चिनी अक्षरं, तिबेटी आणि रोमन वर्णमालेच्या आधारावर नावं दिली आहेत. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा हिस्सा असल्याचा दावा चीन करत आला आहे. तसंच भारतानं त्यावर अवैधरित्या कब्जा केल्याचंही चीनचं म्हणणं आहे. दरम्यान, चीनच्या या कुरापतीनंतर भारतानंही कठोर शब्दांत चीनला प्रत्युत्तर दिलं आहे.
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली. अरुणाचल प्रदेश हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे. तसंच नाव बदलल्यानं काहीही साध्य होणार नाही असंही भारतानं यावेळी स्पष्ट केलं. परराष्ट्र मंत्रालयानुसार चीननं २०१७ मध्येदेखील अशाप्रकारचं कृत्य केलं होतं. त्यावेळी चीननं ६ ठिकाणांची नावं बदलली होती. भारताची भूमिका कायम स्पष्ट राहीली आहे. त्यावेळीही आणि आताही भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे आणि चीनचा त्याच्यावर कोणताही अधिकार नाही, असंही भारतानं स्पष्ट केलं.
या ठिकाणांची नावं बदललीचीनने प्रमाणित केलेल्या आठ ठिकाणांच्या नावांमध्ये शन्नान प्रदेशातील कोना काउंटीमधील सेंगकेजॉन्ग आणि डागलुंजोंग, न्यिंगचीच्या मेडोग काउंटीमधील मनिगांग, डुडिंग आणि मिगपेन, न्यिंगचीच्या जायू काउंटीमधील गोलिंग, डांगा आणि शन्नान येथील लुंझे काउंटीच्या मेजाग या ठिकाणांचा समावेश असल्याचं वृत्त चीनचं सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्सनं प्रसिद्ध केलं आहे. वामोरी, डेउ री, लुंझुब री आणि कुनमिंगशिंगजे फेंग या चार पर्वतांचाही समावेश असल्याचं त्यांत म्हटलंय. याशिवाय चीननं दोन नद्यांचीही नावे बदलली आहेत.
आपल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी भारतातील सर्वोच्च नेते आणि अधिकाऱ्यांच्या अरुणाचल प्रदेशला भेट देण्यास चीन नियमितपणे विरोध करत आला आहे. भारत आणि चीनमध्ये ३,४८८ किमी लांबीची नियंत्रण रेषा (LAC) आहे.