ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 28 - मूल होत नसलेल्या अनेक दाम्पत्यांनी परस्त्रीच्या सहाय्यानं गुणसूत्रे जुळवून सरोगसी पद्धतीनं बाळाला जन्म देण्याचा आविष्कार आपण पाहिलाय. पण मॅक्सिकोमधील डॉक्टरांनी चमत्कार करून दाखवला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तीन जणांच्या डीएनएचा वापर करून बाळाला जन्म देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. न्यू सायन्टिस्ट या नियतकालिकाने हे वृत्त प्रकाशित केले आहे. या डीएनएमध्ये आई, वडील आणि एक माता डोनरच्या डीएनएचा वापर करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे आईच्या गुणसूत्रांमध्ये असलेले दोष बाळामध्ये आले नसून, हे बाळ निरोगी जन्माला आले आहे.
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून अनेक जोडप्यांना आई-बाबा होण्याचा आनंद मिळविण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे या क्षेत्रातही गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून, त्यात नवनवीन संशोधनही केले जात आहे.
बाळाचे आई-वडील जॉर्डन येथे राहणारे असून, बाळामध्ये तिसऱ्या व्यक्तीचे जेनेटिक कोड टाकण्याचे काम अमेरिकी शास्त्रज्ञांनी केल्याचे न्यू सायंटिस्टमध्ये म्हटले आहे. बाळाची आई लीघ सिंड्रोम नावाच्या जेनेटिक रोगाने ग्रस्त आहे. यात रोग्याची नर्व्हस सिस्टम प्रभावित होते. मायटोकॉन्ड्रियल डीएनएच्या माध्यामातून हा रोग बाळाच्या शरीरात प्रवेश करतो. या कारणाने सदर महिलेने यापूर्वी एक सहा वर्षांची मुलगी आणि एक आठ वर्षांचा मुलगा गमावला आहे.तीन जणांच्या डीएनएचा वापर करून बाळाला जन्म देता येऊ शकतो. यावर 90च्या दशकाच्या अखेरीस संशोधन सुरू झाले. त्याचा आधार घेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन या बाळाला जन्म देण्यात आला आहे.