ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - भारताने चार हजार किलोमीटरचा पल्ला गाठत अचूक निशाणा साधत लक्ष्यभेद करणाऱ्या ‘अग्नी-४’ या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने पाकिस्तान बिथरलं आहे. भारताने क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने ही चाचणी प्रादेशिक शांततेसाठी धोका असल्याचं सांगत मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमकडे (एमटीसीआर) चिंता व्यक्त केली आहे.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने बुधवारी एमटीसीआरकडे चिंता व्यक्त केली आहे. एनएसजीप्रमाणे एमटीसीआर हा 35 देशांचा एक समूह आहे. यामध्ये सर्व देश मिळून हत्यार, अण्वस्त्र तसंच रासायनिक हत्यारांवर नियंत्रण ठेवतात. क्षेपणास्त्र, रॉकेट्स तसंच स्वयंचलित विमानांसारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे हा एमटीसीआरचा मुख्य उद्देश आहे.
पाकिस्तानने परराष्ट्र मंत्रालयात भेट घेण्यासाठी आलेल्या एमटीसीआरच्या प्रतिनीधीमंडळाकडे याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सूत्रांनी सांगितले की, अग्नी-४ या क्षेपणास्त्राची चाचणी अत्यंत यशस्वी ठरली. संपूर्णत: भारतीय बनावटीच्या या क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होय. याआधी ९ नोव्हेंबर २०१५ रोजी भारतीय लष्कराच्या सामरिक दल विभागाने घेतलेली चाचणीही यशस्वी राहिली होती. फिरत्या क्षेपणास्त्र वाहकातून हे क्षेपणास्त्र डागता येते.
१७ टन वजनी अग्नी-४ या क्षेपणास्त्राची लांबी २० मीटर आहे. ४ हजार किलोमीटर मारक क्षमता असलेले क्षेपणास्त्र हे अत्याधुनिक हवाई तंत्रासह संगणकप्रणाली आणि वितरण संरचनेसह सज्ज आहे. प्रक्षेपणातील समस्या दूर करून योग्य दिशादिग्दर्शित करणे, हे या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य आहे. या क्षेपणास्त्राची सर्व मापदंडानुसार चाचणी घेण्यासाठी ओडिशा किनारपट्टीवर रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकलप्रणाली तैनात करण्यात आली होती, तसेच शेवटच्या क्षणापर्यंत या क्षेपणास्त्रावर नजर ठेवण्यासाठी लक्ष्यित परिसरात नौदलाचे दोन जहाजही तैनात करण्यात आले होते. अग्नी-४ या क्षेपणास्त्राच्या चाचणीआधी या प्रक्षेपण तळावरून २६ डिसेंबर २०१६ रोज अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. अग्नी-१, २, ३ आणि पृथ्वी क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या ताफ्यात आहेत.