जीनिव्हातील अनेक स्वच्छतागृहे सध्या ५०० युरोच्या हजारो चलनी नोटांनी तुंबली आहेत. कोणीतरी या कित्येक हजार नोटा जीनिव्हातील बँकेची स्वच्छतागृहे आणि रेस्टॉरंट्सच्या स्वच्छतागृहात टाकल्या असून, त्याची चौकशी स्विस अधिकारी करीत आहेत. या नोटांमुळे सगळे पाइप तुंबले आहेत. काही महिन्यांपूर्वी बँकेजवळच्या स्वच्छतागृहात ५०० युरोच्या नोटांचा खच दिसला. या नोटा कात्रीने कापल्याचे दिसले. अशा कापलेल्या नोटांमुळे जवळच्या रेस्टॉरंट्सची स्वच्छतागृहे तुंबल्याचे आढळले. स्वित्झर्लंडमध्ये स्विस फ्रँक हे चलन असून ते नष्ट करणे हा काही गुन्हा नाही. तथापि, युरोपियन युनियनने मोठ्या प्रमाणावर चलनी नोटा नष्ट करण्यास प्रतिबंध केला आहे. परिस्थिती रहस्यमय बनल्यामुळे स्थानिक अधिका-यांनी गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी सुरू केली.याची आम्ही चौकशी करीत आहोत, असे जीनिव्हाच्या सरकारी वकिलाच्या कार्यालयाचे प्रवक्ते हेन्री डेल्ला कासा यांनी सांगितले. जेथे या नोटा सापडल्या, ती स्वच्छतागृहे दुरुस्ती करण्यासाठी स्पॅनिश वकिलाने पैसे दिले. मात्र या वकिलाची चौकशी झाली की नाही हे सांगण्यास प्रवक्त्याने नकार दिला. ५०० च्या युरोचा बेकायदा कारवायांसाठी उपयोग होत असल्याच्या काळजीमुळे त्याचे उत्पादन पुढील वर्षापासून टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे ठरले आहे.
जीनिव्हातील अनेक स्वच्छतागृहांत नोटा, स्विस बँकेचे अधिकारी करतायत चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 4:15 AM