सिंगापूर : ग्रामीण भारतातील लक्षावधी महिलांना स्तनाचा कर्करोग, स्तनातील तंतुजन्य कोशिका (फायब्रोसिस्टी) आजार आणि गर्भवती असताना गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आयोडिनचा अभावच या सर्व समस्यांचे मूळ असून ग्रामीण भारतातील महिलांना आयोडिनची पुरेशी मात्रा उपलब्ध करून देण्यासाठी सिंगापूरच्या ग्रे ग्रुपने नीलवसंत वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्राच्या संयुक्त सहकार्याने ‘ग्रे फॉर गूड’ नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. ही सेवाभावी संस्था महिलांची या त्रासातून सुटका करण्यासाठी आयोडिनयुक्त जीवनरक्षक टिकलींचे (बिंदी) उत्पादन करणार असून या सेवाभावी अभियानाला तलवार बिंदीचेही बळ लाभले आहे.भारतातील प्रत्येक महिला कपाळावर टिकली (बिंदी ) लावत असतात. हे ध्यानात घेऊन ‘ग्रे फॉर गुड’ने सेवाभावाचे व्रत हाती घेत हे समाजहितैषी अभियान सुरू केले आहे. या कार्यासाठी नीलवसंत वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्रानेही मदतीचा हात पुढे केला, असे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्राची पवार यांनी सांगितले.मार्चच्या मध्यापासूनच या अभिनव आणि प्रभावशाली टिकल्यांचे बाडली (नवी दिल्ली), निफाड, पेठ, कोपरगाव आणि सिन्नर येथील महिलांना वाटप करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
महिलांसाठी आयोडिनयुक्त जीवनरक्षक टिकली
By admin | Published: April 02, 2015 11:49 PM