सध्या स्मार्टफोनमध्ये Apple iPhone 13 सीरीजची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे. जेव्हापासून सीरीज लाँच झाली आहे, तेव्हापासून मोठ्या उत्साहाने लोक हा आयफोन खरेदी करत आहेत. पण भारतासोबतच अनेक देशांमध्ये डिलिव्हरीमध्ये अडचणींचा सामना करावा लागल्याची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी, भारतातील एका व्यक्तीने आयफोन 12 ऑर्डर केला होता, परंतु या आयफोनच्याऐवजी डिलिव्हरी बॉक्समध्ये साबण असल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. ही घटना भारतात घडली नसून लंडनमधील आहे. लंडनमध्ये एका महिलेने 1.5 लाख रुपयांना आयफोन 13 प्रो मॅक्स ऑनलाइन ऑर्डर केला, परंतु जेव्हा डिलिव्हरी बॉक्स आला तेव्हा त्यामध्ये 1 डॉलरचा हँड सॅनिटायझर पाठविला. हे पाहून या महिलेला धक्काच बसला. दरम्यान, अशा घटनांमुळे आयफोन खरेदीदारांची निराशा होत असल्याचे दिसून येत आहे.
खौला लाफली नावाच्या महिलेने आपल्या मोबाईलद्वारे कॅरियर स्काय मोबाईलवरून 3 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर 1,500 पौंडमध्ये (1.51 लाख रुपये) आयफोन 13 प्रो मॅक्स खरेदी केला. तिने ऑनलाइन व्यवहार पूर्ण केला, पण दोन दिवसांनंतर जेव्हा तिला डिलिव्हरी बॉक्स मिळाला. त्यामध्ये फक्त एक हँड सॅनिटायझर सापडल्याने धक्का बसला. या हँड सॅनिटायझरची किंमत कदाचित 1 डॉलर आहे.
लाफली यांना कंपनीची सर्व्हिस डिलिव्हरी खराब असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी स्काय मोबाईलकडे तक्रार केली. तरीही त्यांना अद्याप नवीन आयफोन मिळालेला नाही. लाफली यांनी 24 जानेवारी रोजी आयफोन 13 प्रो मॅक्स खरेदी केली आणि एका दिवसात डिलिव्हरी पोहोचण्यासाठी पैसेही दिले. कंपनीने सिंगल-डे डिलिव्हरी आणि आयफोनचे पैसे दोन्ही घेतले. दरम्यान, याप्रकरणी स्काय मोबाईलने चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.