ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - iPhone सारख्या दिसणा-या 9 एमएम डबल बॅरल पिस्तूलामुळे युरोप पोलीस सध्या हाय-अलर्टवर आहे. हे पिस्तूल जेव्हा अमेरिकेत विक्री होण्यास सुरुवात होईल तेव्हा अवैधरित्या ते युरोपात आणलं जाण्याची शक्यता आहे अशी चेतावणी अधिका-यांकडून देण्यात आली आहे.
या iPhone गनसाठी 12 हजाराहून अधिक लोकांनी ऑर्डदेखील दिली आहे. ही पिस्तूल दिसायला हुबेहूब iPhone प्रमाणे आहे. मात्र फक्त एक बटन दाबताच त्याचं रुपांतर पिस्तूलमध्ये होत आहे. द इव्हिनिंग स्टॅडर्डने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांमध्येच युरोपमध्ये या पिस्तूलाच्या आयातीला सुरुवात होईल. हे पिस्तूल 330 पाऊंडमध्ये विकत घेता येणार आहे, ज्याची किंमत iPhone पेक्षा अर्धी आहे.
पोलिसांनी यासंबंधी अगोदरच चेतावणी जारी केली आहे. अशी कोणतीही पिस्तूल सध्या हाती लागलेली नाही, मात्र येत्या काही दिवसांत हे पिस्तूल युरोपमध्ये दिसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी दिलेल्या अलर्टमध्ये, 'दिसताना हे पिस्तूल आणि मोबाईलमध्येही कोणताही फरक जाणवत नाही. अनेक लोक स्मार्टफोन बाळगतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष होण्याती शक्यता आहे', असं सांगितलं आहे. हे पिस्तूल पुढील आठवड्यापासून अमेरिकेत विक्री होण्यास सुरुवात होईल.