Iran airstrike on Pakistan, Jaish al Adal: एकीकडे जगात रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास अशा दोन मोठ्या आघाड्यांवर भीषण युद्ध सुरू आहे. महायुद्धाचा धोका सतत जाणवत आहे. याच दरम्यान इराणने केलेल्या कारवाईमुळे तणाव वाढला आहे. इराणनेपाकिस्तानवर जोरदार हवाईहल्ला चढवला आहे. इराणने जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले आहे. इराणच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. इराणच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला असून त्यांनीही धमकी दिल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध केला. एकतर्फी कारवाई हे चांगल्या शेजारी देशाचे लक्षण नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे. जैश-अल-अदल संघटनेनेही या हल्ल्याबाबत दुजोरा दिला असून, अनेक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाल्याचे म्हटले आहे. याच दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने इराणी अधिकाऱ्यालाही समन्स बजावले आहे.
इराणच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. याशिवाय दोन घरांचीही पडझड झाली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर झालेल्या विध्वंसाचे काही व्हिडिओही समोर आले आहे, ज्यामध्ये अनेक निवासी घरे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. जैश-अल-अदलने हा व्हिडिओ जारी केला आहे.
इराणने ज्या ठिकाणी हल्ला केला तो पंजगुरचा परिसर आहे. हे ठिकाण जैश-अल-अदलचा बालेकिल्ला मानला जात होते. इराणने त्यांचा हाच तळ उद्ध्वस्त केल्याचे बोलले जात आहे. जैश-अल-अदलचे बहुसंख्य दहशतवादी येथे लपले होते. ते येथून दहशतवादी कारवाया करत होते. जैश अल-अदलने केलेल्या हल्ल्याचा बदला इराणने घेतला. डिसेंबरमध्ये जैश अल-अदलने इराणमध्ये मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात ११ इराणी पोलीस ठार झाले होते. जैश-अल-अदलच्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले होते.