इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढता तणाव युद्धापर्यंत येऊन पोहोचला आहे. इराणनेइस्रायलवर ड्रोन हल्ला केला आहे. इराणने 100 हून अधिक ड्रोन आणि 200 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केल्याचा दावा इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने केला आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. इस्रायलने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. अनेक शहरांमध्ये अलर्ट सायरनही वाजवले जात आहेत. याशिवाय इस्रायली हवाई आणि नौदलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी युद्धपातळीवर बैठक बोलावली. इस्रायल व्यतिरिक्त लेबनॉन आणि जॉर्डननेही आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. इराणच्या हल्ल्यानंतर, IDFने एक व्हिडिओ संदेश जारी केला, ज्यामध्ये म्हटले आहे की, 'आयडीएफ त्याच्या मित्र राष्ट्रांसह सर्व शक्तीने इस्रायलचे रक्षण करण्यास तयार आहे.'
ब्रिटन इस्रायलच्या पाठीशी: ऋषी सुनक
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इराणने इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला आहे आणि त्याला 'बेजबाबदार निर्णय' असे म्हटले आहे. इस्रायलच्या सुरक्षेसाठी ब्रिटन उभा राहील, असेही ते म्हणाले आहेत. सुनक म्हणाले की, ब्रिटन आपल्या मित्र राष्ट्रांसह परिस्थिती स्थिर करण्यासाठी आणि पुढील तणाव टाळण्यासाठी तातडीने काम करत आहे.
इराण क्षेपणास्त्र हल्लेही करू शकतो
इराणने 100 हून अधिक ड्रोन सोडल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे. इस्रायली हवाई दल ड्रोनवर लक्ष ठेवून आहे आणि आगामी काळात इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांसाठीही सज्ज आहे. इराणकडूनही क्षेपणास्त्रे डागण्याची भीती इस्रायलने व्यक्त केली आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ल्यानंतर लगेचच सर्वोच्च संरक्षण नेते आणि सुरक्षा यंत्रणांची बैठक घेतली. तेल अवीव येथील लष्करी मुख्यालयात त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
इराणची प्रतिक्रिया
ड्रोन हल्ल्यानंतर काही तासांतच इराणने प्रत्युत्तर दिले. सीरियातील दमास्कस येथील आपल्या दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याला हे प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर इराणने युद्ध थांबवण्याबद्दलही भाष्य केले. या हल्ल्यासोबतच ते प्रकरण संपले असे मानले जाऊ शकते, असे इराण म्हणाले आहे. मात्र, इराणनेही इस्रायलला धमकी दिली आहे. इस्रायलने आणखी एक चूक केली तर इराणची प्रतिक्रिया अत्यंत गंभीर असेल, असे इराणने म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेला इशारा देत हा संघर्ष इराण आणि इस्रायलमधील असल्याने त्यांना यापासून दूर राहावे, असेही सांगितले आहे.