तेहरान- अमेरिकेने इराणवर लादलेल्या बंधनांमुळे काहीही फरक पडणार नाही आपण या आर्थिक दबावाचा सामना करु असा विश्वास इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी व्यक्त केला आहे. इराणी चलनाच्या मूल्यामध्ये मोठी घसरण झाल्यावर इराणी व्यापाऱ्यांनी संसदेसमोर निदर्शने केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीच रुहानी यांनी आपले मत मांडले आहे.
इराणबरोबर अनेक देशांनी सामंजस्य करार केला होता. त्यातून डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमेरिकेने इराणवर बंधने लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इराणची तेल निर्यात घसरण्याची शक्यता असून इराणचे चलनही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराणी नागरिकांनी रियालऐवजी अमेरिकन डॉलर्समध्ये करण्यास सुरुवात केली आहे. रियालचे मूल्य कोसळल्यावर तेहरानमधील व्यापाऱ्यांनी निदर्शने केली.
या परिस्थितीत रुहानी यांनी समोर येत आपल्या व्यापारास कोणताही धक्का पोहोचलेला नाही असे सांगत रियाल कोसळण्यामागे परदेशातील माध्यमे आहेत असे मत मांडले. कितीही वाईट वेळ आली तरी इराणी लोकांच्या मूलभूत गरजा भागवल्या जातील. आपल्याकडे भरपूर साखर, गहू आणि खाद्यतेल आहे. तसेच आपल्याकडे भरपूर परदेशी चलनाची गंगाजळी उपलब्ध असल्याचेही त्यांनी टीव्हीवरुन दिलेल्या भाषणात स्पष्ट केले.वस्तूंचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी इराण विविध मार्गांचा वापर करत आहे. 1300 वस्तूंच्या आयातीवरही बंदी घातली आहे.