मेहसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरू झालं. या आंदोलनात आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव गेला आहे, तर अनेकांना सरकारने अटक केली आहे. यातील काही जणांना सरकारने सार्वजनिकरित्या फाशीही दिली आहे. सोशल मीडियावर अशाच एका कैद्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, ज्याला आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी फाशी देण्यात आली.
कैद्याची शेवटची इच्छा
या व्हायरल व्हिडिओमध्ये त्या कैद्याने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. 'मला फाशी दिल्यानंतर कोणीही शोक व्यक्त करू नये. माझ्या कबरीजवळ कोणी कुराणही वाचू नये. माझ्याच्या मृत्यूनंतर उत्सव साजरा करावा,' इशी शेवटची इच्छा तो व्यक्ती व्यक्त करतोय. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 23 वर्षीय माजिद्रेझा रेहनवरदला सोमवारी मशहद शहरात सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली.
यामुळे फाशी दिलीचार दिवसांपूर्वीच मोहसेन शेकरी नावाच्या तरुणालाही इराण सरकारने सरकारविरोधी निदर्शने केल्यामुळे फाशी दिली होती. आंतरराष्ट्रीय विरोध असूनही इराण सरकारने आंदोलकाला दिलेली ही पहिली फाशीची शिक्षा होती. निदर्शनादरम्यान सुरक्षा दलांना मारणे आणि जखमी केल्याच्या आरोपाखाली माजिद्रेझाला अटक करण्यात आली होती. बेल्जियमचे खासदार दर्या सफाई आणि बीबीसी पत्रकार सेबॅस्टियन अशर यांनी त्याचा अखेरचा व्हिडिओ शेअर केला आहे.
फाशी दिल्यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली
मिळालेल्या माहितीनुसार, माजिद्रेझाला फाशीची शिक्षा देणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. फाशी दिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यापासून इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने सुरू आहेत. महसा अमिनी या कुर्दिश-इराणी महिलेला इस्लामिक ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.