जेरुसलेम - इस्रायलइराणवर हल्ला करण्यासाठी तयार आहे, असा इशारा खुद्द इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनीच दिला आहे. त्याची ही धमकी समुद्रातील एका तेलाच्या टँकरवर झालेल्या घातक ड्रोन हल्ल्यानंतर आली आहे. यासाठी इस्रायलने तेहरानला जबाबदार धरले आहे. गेल्या आठवड्यात तेल टँकर मर्सर स्ट्रिटवर झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी इस्रायलने संयुक्त राष्ट्रातही इराणवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
इराणने आरोप फेटाळले -ओमान अरबी समुद्रात ज्या टँकरवर हल्ला झाला, ते टँकर एका इस्रायली अब्जाधीशाच्या मालकीच्या कंपनीचे होते. या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडनेही इराणलाच जबाबदार धरले आहे. आपल्या भागातील मिलिशियन सहकाऱ्यांसोबत अशा प्रकारच्या ड्रोन हल्ल्यांची सुरुवात करणाऱ्या इराणने, या तेल टँकरवरील हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे म्हटले आहे.
इस्रायल हल्ल्यासाठी तयार -न्यूज वेबसाईट Ynet सोबत बोलताना गॅन्ट्झ यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, इस्रायल इराणवर हल्ला करण्यासाठी तयार आहे? यावर त्यांनी 'होय' असे उत्तर दिले. एवढेच नाही, तर आम्ही अशा स्थितीत आहोत, की आम्हाला इराणविरुद्ध लष्करी कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करताना, आता जगाला इराणविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले होते.
इराणचं प्रत्युत्तर -इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतीबजादेह यांनी, गॅन्ट्झ यांची धमकी म्हणजे, "आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणखी एक क्रूर उल्लंघन आणि दुर्भावनायुक्त व्यवहार", असल्याचे म्हटले आहे. तसेच, इराणविरोधात कुठल्याही प्रकारच्या कृत्याला निर्णायक उत्तर दिले जाईल. असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.