हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाहच्या स्मरणार्थ शुक्रवारी इराणची राजधानी असलेल्या तेहरानमधील ग्रँड मशिदीत हजारो लोक नमाज पठणासाठी एकत्र आले होते. यानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
यावेळी खामेनेई म्हणाले, "आपण अल्लाहने दाखवलेल्या मार्गावरून हाटू नये, मुस्लिमांनी संघटित राहावे. आपल्याला संघटित रहावे लागेल. आपल्याला प्रेमाने रहावे लागेल." इस्रायल प्रति राग व्यक्त करत खामेनेई म्हणाले,"इस्रायलने पॅलेस्टाइनच्या भू-भागावर अवैध कब्जा केलेला आहे."
खामेनेई यांच्या संबोधनातील 10 महत्वाचे मुद्दे -1. हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचे जाणे, आपल्यासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. इराणने इस्रायलला मिसाईलने प्रत्युत्तर दिले आहे.
2. आवश्यकता भासल्यास, आम्ही इस्रायलवर पुन्हा हल्ला करू. हिजबुल्ला आणि लेबनॉनचे नागरीक त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत.
3. पॅलेस्टाईन शत्रूंच्या ताब्यात आहे. पॅलेस्टाईनला जमीन परत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. इराणपासून लेबनॉनपर्यंतच्या मुस्लिमांनी एकत्र यायला हवे.
4. ते (इस्रायल) मुस्लिमांचा शत्रू आहे. ते केवळ आमचे शत्रू नाहीत तर पॅलेस्टाईन आणि येमेनचेही शत्रू आहेत.
5. शत्रूचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत. त्यांना मुस्लिमांसोबत शत्रुत्व वाढवायचे आहे. शत्रूंला त्यांचे राक्षसी राजकारण वाढवायचे आहे.
6. इस्रायलविरुद्धच्या या युद्धात अरब मुस्लिमांनीही आम्हाला साथ द्यावी. आम्ही लेबनॉनसाठी सर्वकाही करू.
7. इस्रायलला लेबनॉनमधून बाहेर काढण्यात आले होते. लेबनॉनच्या मुस्लिमांनी त्यांच्या सन्मानाचे रक्षण केले आणि इस्रायलशी लढा दिला.
8. मुस्लिमांवर अत्याचार केला जात आहे. पॅलेस्टिनी मुस्लिमांच्या हक्कांसाठी हमासही इस्रायलविरुद्ध लढत आहे.
9. कब्जा करू इच्छिणाऱ्या शक्तींविरुद्ध लढण्याचा पॅलेस्टिनी लोकांना पूर्ण अधिकार आहे.
10. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेला हल्ला न्याय्य होता.