मागच्या वर्षभरापासून हमाससोबत संघर्ष सुरू असतानाचा गेल्या काही दिवसांमध्ये इस्राइलने इराणचं पाठबळ असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेला लक्ष्य करून तिच्या अनेक बड्या नेत्यांना ठार मारले आहे. इस्राइलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून, सोमवारी रात्री इराणने इस्राइलवर शेकडो क्षेपणास्त्रांसह जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, इस्राइलला अद्दल घडवण्याचा चंगच इराणने बांधल्याचे संकेत मिळत असून, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह काही बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा करण्याची रणनीती इराणने आखली आहे. त्यासाठी इराणने मोस्ट वाँटेड नेते आणि अधिकाऱ्यांची एक यादीच प्रसिद्ध केली आहे.
इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने इस्राइलमधील मोस्ट वाँटेड नेते आणि अधिकाऱ्यांची ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह त्यांच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रमिख अधिकाऱ्यांचा खात्मा करण्याची धमकी देण्यात आली आहे. इराणच्या गुप्तचर विभागाने ही धमकी हिब्रू भाषेमधून प्रसिद्ध केली आहे. या फोटोमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांचं नाव सर्वात वर आहे. त्यानंतर संरक्षणमंत्री योआव गेलेंट आणि लष्करप्रमुख हर्जी हलेवी यांचं नाव आहे.
दरम्यान, काल रात्री इराणने इस्राइलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील तसेच मध्य पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे. मात्र इराणच्या हल्ल्यानंतरही इस्राइलचा आक्रमकपणा कायम असून इस्राइलने मागच्या १२ तासांत लेबेनॉनवर सहा वेळा एअरस्ट्राइक केली आहे. तसेच प्रत्यक्ष जमिनीवरून हल्ला करण्याचे आदेशही सैनिकांना देण्यात आले आहेत. प्रत्युत्तरदाखल लेबेनॉननेही इस्राइलवर १०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. दरम्यान, इस्राइलच्या लष्कराचे सैनिक आणि हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांमध्ये समोरासमोर झालेल्या चकमकींमध्ये इस्राइलच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार इस्राइलवर हल्ला करण्यासाठी इराणकडून वापरण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये इराणच्या आतापर्यंतच्या सर्वात आधुनिक हत्यारांचाही समावेश होता. तसेच इराणकडून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्रांमध्ये फतह क्षेपणास्त्राचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.