Iran Nuclear Test: इस्रायलशी युद्ध सुरु असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हे मुस्लिम गटांना एकत्र करण्यासह अनेक उद्देशाने पाकिस्तानात दाखल झाले. त्यांनी सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. दोघांमध्ये राजकीय, आर्थिक, व्यापारी आणि सांस्कृतिक स्तरावर द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या चर्चा झाल्या. तसेच, दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करण्याबद्दलही चर्चा झाली. याचदरम्यान, इराणमधील एका खासदाराने केलेल्या एका विधानामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. इराणचे एक खासदार म्हणाले की, सुप्रीम लीडरने (सर्वोच्च नेत्याने) परवानगी दिल्यास आम्ही आठवड्याभरात अणुबॉम्ब चाचणी करू शकतो. इराणच्या अणुसंस्थेच्या माजी प्रमुखाने सांगितले आहे की सर्व आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत, त्यामुळे परवानगी मिळाल्यावर इतक्या कमी मुदतीत हे नक्कीच शक्य आहे.
इराणच्या संसदेतील राष्ट्रीय संरक्षण आणि परराष्ट्र धोरण समितीचे सदस्य असलेले खासदार मोहम्मद जावेद करीमी घोडुसी (Mohammad Javad Karimi Ghoddusi (Qoddusi)) यांनी अणुचाचणीबाबत इशारा दिला असला तरी त्याला आधार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 2015 मध्ये इराणने चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिकेसोबत आपला अणुकार्यक्रम थांबवण्यासाठी करार केला होता. मधल्या काळात असे अनेक अमेरिकन अहवाल आले होते ज्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत खुलासे करण्यात आले होते. 2023 मध्ये अमेरिकेतून एक अहवाल आला होता, त्यात एक सॅटेलाइट इमेज जारी करण्यात आली होती. यात दावा करण्यात आला होता की, हा फोटो इराणमधील डोंगराखाली सुरु असलेल्या अण्वस्त्र केंद्राचा आहे आणि इराण इच्छुक असल्यास दोन आठवड्यात अण्वस्त्रे बनवू शकते. इराणने 83.7 टक्के शुद्ध युरेनियम बनवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे अहवालानुसार ते अण्वस्त्रनिर्मितीपासून दूर नाहीत.
या दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे इराणच्या खासदाराने दिलेली ही धमकी त्यांचे इस्रायलसोबत सुरु असलेल्या युद्धांच्या कालावधीत देण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या हल्ला-प्रतिहल्ला असा संघर्ष सुरु आहे. 1 एप्रिलपासून इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढला होता. इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसवर हल्ला केला. 14 दिवसांनंतर इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिले. इराणच्या हल्ल्याला इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर दिले.