Iran-Israel War : मागील अनेक महिन्यांपासून इराण आणि इस्रायलदरम्यानयुद्ध सुरू आहे. गेल्या आठवड्यात, 13 एप्रिलच्या मध्यरात्री इराणने इस्रायलवर अचानक अनेक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. त्यानंतर इस्रायल जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी चर्चा सुरू झाली. आता त्या घटनेच्या बरोबर एका आठवड्यानंतर शुक्रवारी, म्हणजेच 19 एप्रिल रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला. विशेष म्हणजे, इस्रायलने फक्त इराण नाही, तर आणखी दोन देशांवरही हल्ला केला.
मीडिया रिपोर्टनुसार, इराणशिवाय इस्रायलने इराक आणि सीरियाला टार्गेट केले. इराकची राजधानी बगदादमधील एका इमारतीवर हवाई हल्ला करण्यात आला. या इमारतीत एक उच्चस्तरीय बैठक सुरू होती, ज्यामध्ये अनेक इराण समर्थित गट आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे सदस्य होते. सीरियातील अनेक रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, इस्त्रायली हवाई हल्ल्यांनी दक्षिण सीरियातील अस-सुवेदा आणि दारा प्रांतातील सीरियन सैन्य उद्धवस्त झाली. मात्र, इराणने इस्रायलच्या हल्ल्याचे खंडन केले आहे. तर, इस्रायलनेही अद्याप या हल्ल्यांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
इराण-इराक-सीरिया मित्रराष्ट्रइराण आणि सीरिया, हे जवळचे मित्र आहेत. सीरिया सहसा इराणला आपले सर्वात जवळचे राष्ट्र मानतो. सिरियातील गृहयुद्धात इराणने सीरियन सरकारला जोरदार पाठिंबा दिला होता. इराण आपला मित्र देश सीरियाला सर्व प्रकारची मदत करतो. दोघांमध्ये आणखी एक समान दुवा आहे आणि तो म्हणजे अमेरिका. दोन्ही देशांचे अमेरिकेशी संबंध चांगले नाहीत आणि अमेरिकेला त्यांची मैत्री आवडत नाही. इराण आणि इराक यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधही कोणापासून लपलेले नाहीत. सीरिया आणि इराक हे मध्य पूर्वेतील इराणचे सर्वात मोठे मित्र आहेत.
इराणमधील इस्फहान शहर चर्चेत इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. इराणच्या आण्विक साइटवर तीन क्षेपणास्त्रे पडल्याची बातमी होती. दरम्यान, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आपल्या सर्व लष्करी तळांना हाय अलर्टवर ठेवले आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने शुक्रवारी पहाटे इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळाजवळ मोठा स्फोट झाल्याचे वृत्त दिले होते. इस्फहान शहरात अनेक अणु प्रकल्प आहेत. इराणचा सर्वात मोठा युरेनियम प्रोग्रामही याच ठिकाणात सुरू आहे. या स्फोटांनंतर अनेक उड्डाणे वळवण्यात आली.