इस्त्रायलने हमासवर हल्ला चढविल्याच्या घटनेला आता सहा महिने झाले आहेत. यामध्ये पॅलेस्टाईनचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच आता ईराण येत्या दोन दिवसांत इस्त्रायलवर हल्ला करण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.
अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचे वृत्त दिले आहे. इराणच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनेई यांना इस्त्रायलवरील हल्ल्याचा प्लॅन सादर करण्यात आला असून ते यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे. अद्याप त्यांनी यावर निर्णय घेतला नसून इस्त्रायलदेखील उत्तर आणि पश्चिमेकडील भागात इराणच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्याची तयारी करण्यात गुंतला आहे.
अमेरिकेच्या इंटेलिजन्सच्या रिपोर्टनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांनीही सौदी अरेबिया, चीन आणि तुर्कीसह अन्य युरोपीय देशांना फोनाफोनी सुरु केली आहे. या देशांना ईराणची समजूत घालण्यास आणि हल्ल्यापासून परावृत्त करण्यास सांगण्यात आले आहे.
कुठे माशी शिंकली...पॅलेस्टाईनवर इस्त्रायलने हल्ला केल्यानंतरही इराणने युद्धापासून स्वत:ला दूर ठेवले होते. परंतु १ एप्रिलला सिरीयामध्ये इराणच्या दूतावासाजवळ इस्त्रायलने हवाई हल्ला केला आणि त्यात इराणचे दोन आर्मी कमांडर मारले गेले. यात १३ जणांचा मृत्यू झाला. यामुळे चिडलेल्या इराणने इस्त्रायलला याचा बदल घेण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने हमास युद्धातही आपल्या नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या नव्हत्या, त्या आता देण्यात आल्या आहेत. अमेरिकी अधिकाऱ्यांनीही योग्य काळजी घेतल्याशिवाय बाहेर पडू नये असे अमेरिकेने म्हटले आहे.