मध्य पूर्व देशांमध्ये सध्या मोठा संघर्ष पेटला आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहला ठार केल्यानंतर दक्षिणी लेबनानमध्ये इस्त्रायलनं ग्राऊंड ऑपरेशन केले. त्यानंतर आता इराणनं इस्त्रायलवर हल्ला करत मिसाईल डागल्या आहेत. इराणनं इस्त्रायलवर १८० मिसाईलचा मारा केला आहे. इराणचा हा हल्ला नियोजित होता. तेल अवीवमध्ये इस्त्रायलचे ३ मिलिट्री बेस आणि गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयाला मिसाईलने लक्ष्य केले.
इस्त्रायलच्या Naveatim, Hatzerim आणि Tel Nof मिलिट्री बेसवर मिसाईलनं हल्ला करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेवाटिमवर काही मिसाईल पडल्या हे दिसते. इराणनं या हल्ल्यात Fattah मिसाईलचा वापर केला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आयडीएफचा एक सैनिक गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी सैनिकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इराणच्या या हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या मध्य आणि दक्षिण भागात नुकसान झाले आहे. हल्ल्यात जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती समोर आली नाही.
जिथे जागा मिळेल तिथे लपले लोक
इराणच्या या हल्ल्यात प्रामुख्याने जेरुशलम आणि तेल अवीव यांना टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यामुळे इस्त्रायलमध्ये रात्रभर सायरनचा आवाज वाजत होता. तेल अवीवमध्ये सायरन वाजताच जिथे जागा मिळेल तिथे लोक लपत होते. सायरन वाजताच तेल अवीवच्या एका ब्रिजखाली लोकांनी आश्रय घेतला. इस्त्रायलमध्ये ज्या ज्याठिकाणी शेल्टर्स आणि बंकर्स आहेत तिथे मोठ्या प्रमाणात लोक आश्रयास आले होते. जर इस्त्रायलनं या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा इराणनं दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी इस्त्रायलमधील अमेरिकन सैन्यांना यहूदी राष्ट्राच्या संरक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अमेरिकन सैन्यांनी इराणच्या अनेक मिसाईलला हवेतच उद्ध्वस्त केले. इराणनं इस्त्रायलवर जितक्या मिसाईल डागल्या त्यातील बहुतांश हवेतच उडवण्यात आली. त्यामुळे जमिनीवर हल्ल्यापासून होणारं नुकसान कमी झालं. अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी इराणच्या हल्ल्याला अयशस्वी केले अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.