सध्या इस्रायल लेबनॉन आणि गाझामध्ये जबरदस्त हल्ले करत आहे. हमासने तर युद्धविरामास सहमतीही दर्शवली आहे. मात्र, आणखी मोठे युद्ध तोंडावर दिसत आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराण 1 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्त्रायलने हल्ला केल्यास कशा पद्धतीने कारवाई करायची याचा प्लॅन आखत आहे. या वृत्तानुसार, चार इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अयातुल्ला खमेनी यांनी लष्कराला तयारी करण्यास सांगितले आहे, संभाव्य परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच, इस्रायलने हल्ला केल्यास त्याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यायचे याची योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
यातील 2 अधिकारी इराणच्या लष्कराशी संबंधित आहेत. ते म्हणाले, "इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र आणि तेल केंद्रांवर हल्ला केल्यास युद्ध थांबणार नाही. इराण युद्ध अका नव्या पातळीवर घेऊन जाईल आणि संपूर्ण मध्यपूर्व याच्या कवेत येऊ शकते." सूत्रांच्या म्हणण्यानुसार, इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा ताफा तयार ठेवला आहे. इस्रायलने हल्ला केल्यास प्रत्युत्तरात 1000 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. 1 ऑक्टोबर रोजी केवळ 200 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती.
मात्र, या स्तरावर युद्ध पोहोचल्यास, तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा अमेरिकेसह अनेक देशांसाठी चिंतेचा विषय होऊ शकतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गही विस्कळीत होईल. तसेच, इराणचे नेतृत्वही यावरही विचार करत आहे की, जर इस्रायलने केवळ लष्करी तळांवर हल्ले केले तर फारशी कारवाई केली जाणार नाही. इराण थेट हल्ला करणार नाही, अशीही शक्यता आहे. अशा प्रकारे दोन मोठ्या शक्तींमधील थेट युद्ध टळेल.