तेहरान: युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमानइराणची राजधानी तेहरानमध्ये कोसळलं आहे. तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमातळावरुन उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड झाला. या विमानात १८० प्रवासी होते. यातील एकही प्रवासी वाचू शकला नाही. इराणमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं असोशिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या बोईंग ७३७ विमानात उड्डाणानंतरच्या अवघ्या काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाला. विमान कोसळताच त्याला आग लागली. विमानातील प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी २२ रुग्णवाहिका, चार बस रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या. मात्र विमानाला लागलेली आग भीषण असल्यानं मदतकार्य सुरूच करता आलं नाही, अशी माहिती इराणचे आपत्कालीन सेवेचे प्रमुख पिऱ्होसेन कौलीवांद यांनी दिली. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानानं बुधवारी सकाळी उड्डाण केलं. मात्र काही वेळातच विमानानं हवाई वाहतूक नियंत्रणाला माहिती पाठवणं बंद केलं. यानंतर हे विमान कोसळलं. किवच्या दिशेनं जाणारं हे विमान ३ वर्षे जुनं होतं. इराणनं त्यांच्याच देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतरच्या अवघ्या काही तासांत युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान कोसळल्याची घटना घडली. कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. यामध्ये अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणनं केला. या हल्ल्याला अमेरिकेनं दुजोरा दिला. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे.