Iran Supreme Leader Khamenei : दुबई/बेरूत: इस्रायलने काल लेबनॉनमधील बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह याचा खात्मा करण्यात आला आहे. लेबनॉननेही आज हिजबुल्लाह प्रमुख सय्यद हसन नसराल्लाहच्या हत्येची पुष्टी केली आहे. हिजबुल्लाहने एका निवेदनात म्हटले आहे की, हसन नसराल्लाह मारला गेला आहे.
गाझा, पॅलेस्टाईन आणि लेबनॉन आणि त्यांच्या सन्माननीय लोकांच्या समर्थनार्थ इस्रायलविरुद्धचा लढा सुरू ठेवणार असल्याचेही हिजबुल्लाहने जाहीर केले. हिजबुल्लाह प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलविरुद्ध युद्ध लढण्याचे आवाहन केले आहे.
काल (दि.२७) बेरूतच्या दक्षिणी उपनगरात हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला. हसन नसराल्लाह याच्या मृत्यूच्या घोषणेनंतर, हिजबुल्लाहच्या अल-मनार टीव्हीने कुराणातील श्लोक प्रसारित करण्यास सुरुवात केली. हसन नसराल्लाहने इस्रायलसोबतच्या दशकभराच्या संघर्षात हिजबुल्लाहचे नेतृत्व केले होते. १९९२ मध्ये हसन नसराल्लाहला हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनवण्यात आले.
इराणच्या पाठिंब्याने हसन नसराल्लाहने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटना अतिशय मजबूत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली होती. लेबनॉनमध्ये २०१८ च्या संसदीय निवडणुकीतही हिजबुल्लाहला मोठा विजय मिळाला होता. त्यामुळे लेबनॉनच्या राजकीय विभागात हसन नसराल्लाहचा चांगला प्रभाव होता. त्याने दावा केला होती की, लेबनॉनमध्ये १ लाखांहून अधिक हिजबुल्लाह सैनिकांची फौज तयार करण्यात आली आहे.
इस्रायली सैन्याने हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचा नेता हसन नसराल्लाहचा खात्मा केला आहे, असे इस्रायली सैन्याचे प्रवक्ते अविचाई अद्राई यांनी ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर दुसरीकडे, हसन नसराल्लाह याच्या हत्येनंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी सर्व मुस्लिमांना एकत्र येऊन युद्ध लढण्यास सांगितले आहे. अली खामेनेई यांनी मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन केल्यानंतर मध्यपूर्वेत मोठे युद्ध होण्याची भीती वाढली आहे.