ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 9 - पाकिस्तानने सुन्नी दहशतवाद्यांना रोखले नाही तर, पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त करु अशी धमकी इराणच्या लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिली आहे. भारताप्रमाणे इराणही पाकिस्तानच्या सीमेवरील घुसखोरीच्या कारवायांमुळे त्रस्त आहे. मागच्या महिन्यात इराणच्या सीमेवर तैनात असलेले दहा सैनिक पाकिस्तानातून झालेल्या गोळीबारात ठार झाले. जैश-अल-अदल या पाकिस्तानातील सुन्नी दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी हा गोळीबार केला होता.
ड्रग तस्कर आणि दहशतवाद्यांनी इराण-पाकिस्तान सीमेवर मोठया प्रमाणावर अशांतता निर्माण केली आहे. पाकिस्तानची ही आगळीक आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा मेजर जनरल मोहम्मद बाकीरी यांनी दिला. ते इराणीयन लष्कराचे प्रमुख आहेत. पाकिस्तान आपल्या भूभागातून चालणा-या दहशतवादावर कारवाई करेल अशी अपेक्षा करतो असे मोहम्मद बाकीरी म्हणाले. जर असेच दहशतवादी हल्ले सुरु राहिले तर, पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करावे लागतील असे इराणीयन लष्करप्रमुख म्हणाले.
मागच्या आठवडयात इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचा दौरा केला. त्यावेळी नवाझ शरीफ सरकारने इराणला लागून असणा-या सीमेवर सैन्य तुकडीची संख्या वाढवण्याचे आश्वासन दिले होते. 2014 मध्येही जैश अल अदलच्या दहशतवाद्यांनी पाच इराणीयन सैनिकांना बंधक बनवल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अशाच प्रकारचा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी सुद्धा इराणने पाकिस्तानात घुसण्याची धमकी दिली होती.
एका सुन्नी धर्मगुरुने हस्तक्षेप केल्यानंतर हा तणाव निवळला होता. काही महिन्यांनी इराणच्या चौघा सैनिकांची सुटका करण्यात आली पण एका सैनिकाची दहशतवाद्यांनी हत्या केली. इराण हा शिया बहुल मुस्लिम देश आहे. तिथे सुन्नी मुस्लिमांना सापत्न वागणुक दिली जाते असा पाकिस्तानचा दावा आहे. याचा निषेध म्हणून जैश अल अदलचे दहशतवादी इराणीयन सुरक्षा पथकांवर हल्ले करतात. जैश अल अदलने एप्रिल 2015 आणि ऑक्टोंबर 2013 मध्ये इराणीयन सैन्यावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.