Iran Warns America :इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी शुक्रवारी(7 फेब्रुवारी) अमेरिकेच्या धमक्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच, 'अमेरिकेने काही चुकीचे पाऊल उचलले, आमच्या देशाच्या सुरक्षेत अडथळा आणला, तर आम्ही देखील जोरदार प्रत्युत्तर द्यायला मागेपुढे पाहणार नाही', असा थेट इशाराही दिला. खमेनी यांचा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्याशी गाझा ताब्यात घेण्याच्या आणि येथील लोकसंख्येला इतर देशात स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली आहे.
अमेरिका जगाचा नकाशा बदलतोय !गाझामधून पॅलेस्टिनींना बळजबरीने शेजारच्या अरब देशांमध्ये स्थलांतरित करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाचा संदर्भ देत खमेनी म्हणाले, अमेरिका कागदावर जगाचा नकाशा काढतोय, पण हा केवळ कागदावरच आहे, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसेच, अमेरिकेशी वाटाघाटी करणे ही शहाणपणाची, विवेकाची किंवा आदराची बाब नाही, असेही खमेनी यांनी म्हटले आहे.
मात्र, खामेनी यांचे हे विधान त्यांच्या आधीच्या विधानाच्या विरोधात आहे, ज्यात खमेनेई यांनी अमेरिकेशी चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, खमेनी यांनी अमेरिकेशी चर्चा न करण्याचा कोणताही थेट आदेश अद्याप जारी केलेला नाही. मात्र, इराणच्या भूमिकेत झालेला बदल ट्रम्प यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याशी जोडला जात आहे. मंगळवारी इस्रायली पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले होते की, गाझावर अमेरिकेचे नियंत्रण आले पाहिजे आणि अमेरिकेने गाझामध्ये पुनर्निर्माणाचे काम केले पाहिजे. गाझातील विस्थापित लोकांना गाझाच्या बाहेर स्थायिक करण्याची सूचना त्यांनी केली.