वॉशिंग्टन: इराणबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकन जनतेशी पत्रकार परिषदेद्वारे संवाद साधला. इराणने लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात एकही अमेरिकी सैनिक जखमी नसल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. तसेच इराणला आम्ही अण्वस्त्र तयार करु देणार नसल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराणने जर अण्वस्त्र निर्मिती केल्यास आर्थिक निर्बंध आणू, असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले की, अमेरिकन नागरिकांना धोका होता म्हणून सुलेमानींना मारलं. तसेच इराणने केलेल्या हल्यात अमेरिकेच्या सैनिकी तळाचं नुकसान झालं आहे. मात्र सर्व अमेरिकन सैनिक सुरक्षित असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे इराणविरोधात युरोपीय देशांनी एकत्र येण्याचं आवाहनदेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी केलं आहे.
आम्ही अनेक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तयार केली आहेत. तसेच अमेरिकेकडे मोठे सैन्य आणि विविध शस्त्रास्त्रे आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी याचा अर्थ असा होत नाही की आम्ही ती वापरलीच पाहिजेत. त्याचप्रमाणे आम्हाला वापरायचे देखील नाही, असं सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध करायचे नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
सुलेमानी यांची हत्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा इराणकडून करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री इराण समर्थित मिलिशियाने इराकमधील अमेरिकन दुतावासासह अन्य काही अमेरिकन ठिकाणांवर रॉकेट आणि मोर्टारने हल्ले केले होते. तसेच शनिवारी सकाळी इराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले होते. इराणमधील महत्त्वाची 52 ठिकाणे निशाण्यावर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र अमेरिका सध्या कोणत्याच युद्धाचा विचार करत नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.