युक्रेनचे विमान चुकून पाडले, इराणी सैन्याने दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 9:56 AM
इराणच्या हवाई हद्दीमध्ये युक्रेनच्या विमानाला झालेल्या अपघातात 176 जणांचा झाला होता मृत्यू
तेहरान - युक्रेनच्या विमान कंपनीच्या बोईंग 737 या प्रवासी विमानाला बुधवारी झालेल्या अपघाताबाबतइराणी लष्कराकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. आपल्याकडून युक्रेनचे प्रवासी विमान चुकून पाडले गेल्याची कबुली इराणी सैन्याने दिली आहे. हे विमान बुधवारी उड्डाणानंतर लगेचच कोसळून 167 प्रवासी व नऊ विमान कर्मचारी, असे सर्व 176 जण मृत्युमुखी पडले होते. कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिकेशी ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्याचवेळी एक विमान इराणच्या लष्करी तळाजवळ आल्याने इराणी सैन्याने त्या विमानालाला क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे हे विमान अपघातग्रस्त होऊन कोसळले होते. हे विमान बुधवारी तेहरान येथील खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जाण्यासाठी सकाळी ६.१० मिनिटांनी निघाले होते..विमानतळाच्या वायव्य दिशेला ४५ किलोमीटरवर शहरीयार परगण्यातील खलाज अबाद येथे ते शेतात कोसळले. उड्डाणानंतर काही मिनिटांतच ते रडारवरून अदृश्य झाले होते. या दुर्घटनेत 176 जाणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 82 इराणी, 63 कॅनडाचे, 11 युक्रेन, 10 स्वीडन, 4 अफगाणिस्तानचे, जर्मन व ब्रिटनचे प्रत्येकी तीन नागरिक होते.