तेहरान - इराणमध्ये हिजाब व्यवस्थित न घातल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्यापासून मोठे आंदोलन पेटले आहे. महिलांकडून हिजावला विरोध केला जात आहे. आंदोलनाला १० दिवस उलटल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणीचा मृत्यू झाल्याने आंदोलनाची आग अधिकच भडकली आहे. या तरुणीचं नाव हदीस नजफी असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तिच्या डोक्यामध्ये आणि मानेवर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. मृत्यूनंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, हिजाबविरोधात लोकांमध्ये वाढत असलेल्या असंतोषामुळे आंदोलन अधिकाधिक भडकत चालले आहे. त्यामुळे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांकडून बलप्रयोग केला जात आहे. इराणमध्ये जागोजागी होत असलेल्या आंदोलनांमधून महिला हिजाबला आग लावताना दिसत आहेत. हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मार केला जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार या गोळीबारात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्वतंत्र संस्थांच्या अंदाजानुसार या गोळीबारात किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे.
या आंदोलनामध्ये दीस नजफी, गजाला चेलावी, हनाना किया आणि महशा मोगोई यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दरम्यान, इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या काळात लोकांच्या भूमिकेचं समर्थन केल्याप्रकरणी नॉर्वेच्या राजदूतांना पत्र पाठवण्यात आले आहे. इराणी संसदेचे अध्यक्ष मसूद घराहखानी यांनी हे समन्स पाठवले आहे.