बगदाद : इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले आहे. मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱ्य़ाचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाल्याचे समजते.
बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (3 जानेवारी) रॉकेट हल्ला झाला आहे. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. अनेक सैनिक जखमी झाले आहेत. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने सुलेमानी यांच्या मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. सुलेमानी यांना पश्चिम आशियातील इराणच्या कारवायांचे प्रमुख रणनीतिकार म्हटले जात होते. सुलेमानी यांच्यावर सिरियामध्ये पाय रोवणे आणि इस्त्रायलवर रॉकेट हल्ला करण्याचा आरोप होता. अमेरिकाही सुलेमानीच्या मागावर होती.पेटॅगॉननेही या हल्ल्याच्या वृत्ताला होकार दिला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या सैन्याने सुलेमानीला ठार केल्याचे म्हटले आहे.
तर डोनाल्ड ट्रम्प य़ांनी फक्त अमेरिकेचा झेंडा ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये कोणताही संदेश लिहिण्यात आलेला नाही. या हल्ल्यामुळे पश्चिम आशियामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. सुलेमानी हा इस्लामिक रिव्होल्यूशनरी सेनेच्या एका ताकदवान विंग 'कदस फोर्स'चा प्रमुख होता. अल महांदिस एका सशस्त्र सैनिकांच्या गराड्यात सुलेमानीला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. सुलेमानीचे विमान सिरिय़ा किंवा लेबनॉनहून बगदादला पोहोचले होते. सुलेमानी जसे विमानातून उतरले तेव्हाच अमेरिकेने मिसाईल डागले. सुलेमानीचा मृतदेह त्याच्या अंगठीवरून ओळखण्यात आला आहे.