इराकमध्ये मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल मोठा बदल होणार आहे. आता विवाह कायद्यात संशोधन करून मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून कमी करत ९ वर्ष करण्याची इराकची तयारी सुरू आहे. नव्या कायद्यानुसार कुठल्याही वयाचा पुरुष ९ वर्षाच्या मुलीसोबत लग्न करू शकतो. इतकेच नाही तर नव्या कायद्यात मुलींना तलाक, वारसा आणि मुलांचा हक्क हे अधिकारही मिळणार नाहीत. या प्रस्तावाला इराकमधील लोकांसह जगभरातून विरोध होत आहे. इराकमधील महिला याविरोधात आंदोलन करत आहेत.
मध्य पूर्व देशांमध्ये पर्सनल स्टेटस लॉ किंवा कायदा १८८ प्रथम इराकमध्ये १९५९ मध्ये लागू करण्यात आला. त्यावेळी धार्मिक भेदभावाशिवाय सर्व इराकी कुटुंबांच्या हक्कांचे रक्षण करणारा हा मध्य पूर्वेतील सर्वात प्रगतीशील कायदा मानला जात असे. आता कट्टरपंथी शिया मुस्लीम पक्षांचे युती सरकार इराक संसदेत या कायद्यातील सुधारणांसाठी मतदान करण्याच्या तयारीत आहे. मुलींना लग्नानंतरचे सर्व हक्क हिरावून घेण्यासाठी यात सुधारणा करण्याचाही प्रस्ताव आहे.
सरकारचा तर्क काय?
आता इराकमध्ये शिया पक्षांच्या युतीसह पुराण मतवादी सरकार आहे. ते असा तर्क देत आहेत की, हा कायदा वयाच्या नवव्या वर्षी लग्न करून मुलींना अनैतिक संबंधांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच हा सुधारणेचा प्रस्ताव आणला जात आहे. सुधारणा दुरुस्ती इस्लामिक शरिया कठोर कायद्याच् धर्तीवर केली आहे. या माध्यमातून तरुणींना संरक्षण मिळू शकते, असा कट्टरतावादी सरकारचा दावा आहे. संसदेत बहुमत असल्याने इराकी महिला गटांच्या विरोधाला न जुमानता हा कायदा पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
दरम्यान, युनिसेफच्या एका रिपोर्टनुसार कायदा बनण्यापूर्वीच इराकमध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. जवळपास २८ टक्के मुलींचे लग्न वयाच्या १८ वर्ष होण्याआधीच होत आहे. त्यात अशाप्रकारे कायदा बनवून स्थिती आणखी बिघडू शकते. या कायद्यामुळे मुलींचे लैंगिक शोषण आणि शारीरिक हिंसेचा धोका आणखी वाढेल. मुली शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहतील. नव्या कायद्याने बालविवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल आणि उघडपणे छळ सुरू होईल असा इशारा ह्युमन राइट्स वॉच या सामाजिक संस्थेने दिला आहे.