बगदाद : इसिस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील फालुजा या महत्त्वाच्या शहरावर इराकी लष्कराने नियंत्रण मिळविले आहे. फालुजा हे शहर इसिसचा गढ मानला जात होता. या शहरातील युद्ध समाप्त झाल्याची घोषणा इराकने केली आहे. दहशतवादविरोधी मोहिमेत इराकी लष्कराचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल अब्दुल वहीद अली सादी यांनी सांगितले की, शहराच्या काही भागावर इसिसचे नियंत्रण होते. आता संपूर्ण शहरच आमच्या ताब्यात आले आहे. फालुजा इसिसच्या ताब्यातून पूर्ण स्वतंत्र करण्यात आले आहे. जानेवारी २०१४ मध्ये इसिसने या शहरावर ताबा मिळविला होता. मे महिन्याच्या सुरुवातीला इराकी लष्कराने शहरावर कारवाई करण्यास प्रारंभ केला होता आणि स्थानिक रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सांगितले होते. फालुजा ताब्यात घेताना करण्यात आलेल्या कारवाईत इसिसचे किमान १,८०० दहशतवादी ठार झाले, असे सादी यांनी सांगितले.इराकी लष्कराने कारवाई सुरू करताच हजारो लोकांनी शहरातून पलायन केले होते. काही वृद्ध, महिला, मुले यांनी भरउन्हात छावण्यांत आश्रम घेतला होता. इराकचे पंतप्रधान हैदर अल अबिदी यांनी इराकी लष्कराच्या या यशाबद्दल सैनिकांचे अभिनंदन केले आहे.पश्चिम अन्बार प्रांतातील फालुजा हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून, इराकमध्ये इसिसच्या ताब्यात आलेले हे पहिले शहर होते. अलीकडील काही महिन्यांत इराक आणि सिरिया या दोन्ही देशांत अनेक भूप्रदेश इसिसने गमावला आहेत. आता इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरावर ताबा मिळविण्याचा इराकी लष्कर प्रयत्न करणार असल्याचे सादी म्हणाले. (वृत्तसंस्था)
इराकी लष्कराने पुन्हा फालुजा शहर जिंकले
By admin | Published: June 27, 2016 4:25 AM