बगदाद : इराकी फौजा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे शहर असणा:या तिक्रीत शहराचा ताबा पुन्हा घेण्यासाठी लढत असून, त्यांना सुन्नी बंडखोर मागे सारत असताना, रशियाने पाच सुखोई लढाऊ विमाने पाठविली आहेत. ही बाब इराकी सैन्याचे बळ वाढविणारी असून, सुन्नी बंडखोरांविरोधातील संघर्ष आता अधिकच तीव्र बनण्याची चिन्हे आहेत.
सरकारी विमानांनी तिक्रीत शहरावर रविवारी पहाटे हल्ला केला, त्यामुळे संपूर्ण शहरात ठिकठिकाणी चकमकी चालू आहेत. हजारो सैनिक नव्या दमाने सुन्नी बंडखोरांवर तुटून पडले आहेत. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (आयएसआयएल) या सुन्नी बंडखोरांच्या संघटनेने अर्धाअधिक इराक ताब्यात घेतल्यानंतर इराकी सैन्याची ही चढाई सुरूझाली आहे. आंतरराष्ट्रीय नेत्यांनी इराकमध्ये नवे सरकार गठित करावे अशी आग्रही भूमिका घेतली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर अद्याप नवे सरकार सत्तेवर आलेले नाही. (वृत्तसंस्था)
4नवी दिल्ली : इराकमधील परिस्थितीवर चर्चेसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आखाती देशांतील प्रमुख भारतीय राजदूतांची रविवारी बैठक घेतली. भारत इराकमधील आपल्या दहा हजार नागरिकांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करीत आहे. इराकमधील संघर्षविहीन भागातून नागरिकांना हलविण्यासाठी भारताने तीन कार्यालये उघडली आहेत. तेथील अधिकारी भारतीय नागरिक काम करीत असलेल्या ठिकाणी जातील व ते मायदेशी परतू इच्छित असतील, तर त्यांच्या परतण्याची व्यवस्था करतील. भारतीय नागरिकांना प्रवासाची कागदपत्रे व विमान तिकिटे देण्यात येणार आहेत.