बगदाद : पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ले व्हायच्या एक दिवस आधी वरिष्ठ इराकी गुप्तचर अधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाचा हल्ला अतिरेकी संघटनेकडून होऊ शकेल असा इशारा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इस्लामिक स्टेटविरुद्ध लढणाऱ्या सदस्य देशांना दिला होता. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इराकी गुप्तचर अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या संदेशात अतिरेक्यांच्या गटाचा नेता अबू बकर अल बगदादीने अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराक आणि सिरियावर हल्ले करणाऱ्या गटाच्या देशांवर काही दिवसांतच हल्ले करण्याचा आदेश दिल्याचे म्हटले होते. असे हल्ले (बॉम्बिंग किंवा इतर स्वरूपाचे) रशिया आणि इराण यांच्यावरही करण्याचे त्याने सांगितले होते. त्या इशाऱ्यामध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणांवर व कधी हल्ले होतील याचा तपशील दिला गेला नव्हता. अशा स्वरूपाची माहिती व निरोप फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेला नेहमीच व रोजच मिळत असे, असे फ्रान्सच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. इराकने दिलेल्या इशाऱ्याबद्दल कोणतेही नेमके भाष्य न करता अमेरिकेचा वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणाला की, पॅरिस हल्ला उधळून लावता येईल, अशी माहिती पाश्चिमात्य देशांना दिल्या गेल्याची मला माहिती नाही. सिरियामध्ये जे देश लढत आहेत त्यांच्यावर इस्लामिक स्टेटच्या चिथावणीतून हल्ले होत असल्याबद्दल अमेरिका, फ्रान्स व इतर पाश्चिमात्य राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून चिंता व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)
इराकी गुप्तचरांनी दिला होता इशारा
By admin | Published: November 17, 2015 2:58 AM