बगदाद : इराकने ‘तिक्रीत’ शहर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मोठी लष्करी मोहीम हाती घेतली आहे. सद्दाम हुसैन यांच्या या शहरावर ‘इस्लामिक स्टेट’ अर्थात इसिसचा ताबा आहे. लढाऊ विमानांच्या मदतीने इराकी सैन्याने शहरावर हल्ला केल्याचे वृत्त इराकी टीव्हीने दिले आहे. बगदादच्या उत्तरेला १५० कि. मी.वर असलेले हे शहर इसिसने गेल्या वर्षी जूनमध्ये ताब्यात घेतले होते. तिक्रीत मोहिमेपूर्वी पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी सलाउद्दीन प्रांतात लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी इसिसमधून बाहेर पडणाऱ्या सुन्नी बंडखोरांसमोर माफीचा प्रस्ताव ठेवतानाच ही शेवटची संधी असल्याचा इशाराही दिला. हजारो सैनिक व खासगी सैन्यदलाचे सदस्य युद्ध तयारीसाठी समारा शहरात गोळा झाल्यानंतर अबादी यांनी युद्धाची घोषणा केली. (वृत्तसंस्था)इसिसने गेल्या वर्षी इराकचे अनेक भाग ताब्यात घेतले होते. सर्वप्रथम मोसूल शहरावर इसिसचा झेंडा फडकला. त्यानंतर तिक्रीत हे दुसरे मोठे शहर त्यांच्या ताब्यात आले. सुन्नीबहुल सलाउद्दीन प्रांतातील मोठ्या भूभागावर इसिसने ताबा मिळवलेला आहे.
इसिसच्या ताब्यातून तिक्रीत परत घेण्यासाठी इराकची मोहीम सुरू
By admin | Published: March 03, 2015 12:49 AM