Ireland, 400 Houses Evacuated: जगात सध्या राजकीय परिस्थिती फारच भीषण होत चालली आहे. एकीकडे रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. दुसरीकडे हमास-इस्रायल-इराण यांच्यातही हल्ले-प्रतिहल्ले होत आहेत. अशातच आता इतिहासातील एका गोष्टीमुळे युरोपात एकच खळबळ उडाली. आयर्लंडमधील तब्बल ४०० घरे तातडीने रिकामी करण्यात आली. इतक्या अचानक असा निर्णय का घेतला गेला? जाणून घेऊया सविस्तर.
युरोपीय देश आयर्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धातील काही संशयित बॉम्बचे भाग सापडले. त्यानंतर कोणत्याही प्रकारची भयंकर घटना टाळण्यासाठी ४०० घरे रिकामी करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित हे उपकरण शुक्रवारी आयर्लंडमधील काउंटी डाउन भागातील न्यूटाउनर्ड्समधील रिव्हनवुड बांधकामाच्या साइटवर सापडले. त्यानंतर पोलिसांनी या भागात तपास व चौकशी सुरू केली आहे.
परिसरात उत्खनन करून कोणत्याही प्रकारचा बॉम्ब बाहेर काढण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. बॉम्ब निकामी करणारे युनिट सध्या साइटवर आहे. नियोजित नियंत्रित स्फोटापूर्वी उपकरणावर वाळूचा ढीग करण्यासाठी लष्करी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली खोदकाम करणाऱ्यांचा वापर केला जात आहे. या कारवाईला ५ दिवस लागतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
संशयास्पद वस्तू कशी सापडली?
बांधकाम साइटचे विकसक जेम्स फ्रेझर यांनी सांगितले की, या भागात बरेच बांधकाम सुरू आहे, तेथे ४० हून अधिक घरे बांधली जात आहेत. या उत्खननादरम्यान कामगारांना बॉम्बसारखे काहीतरी संशयास्पद आढळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ४०० घरे रिकामी केली.
पोलिसांनी नोटीस बजावली
शुक्रवारी बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या परिसरात नोटीस जारी करून बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून ४०० मीटरपर्यंतची सर्व घरे खाली करण्याचे आदेश दिले. खोदकामात कोणतीही जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या लोकांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले.
पोलीस काय म्हणाले?
बॉम्बसदृश संशयित वस्तू योग्यपद्धतीने जमिनीच्या आतून बाहेर काढण्यासाठी सशस्त्र दलाचे सदस्य शनिवारी घटनास्थळी पोहोचले, असे स्थानिक नगरसेवकाने सांगितले. अधीक्षक जॉन्स्टन मॅकडॉवेल म्हणाले, जे लोक घरं रिकामी करुन कारवाईचे महत्त्व समजून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.